राजेंद्र झेंडे, महान्युज लाईव्ह
दौंड : दौंड तालुक्यातील गार- बेटवाडी ग्रामपंचायत सरपंच राणी सचिन भुजबळ यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या सरपंच पदाचा राजीनामा देऊन दिलेला शब्द पाळला. त्यांनी अवघ्या अडीच वर्षाच्या कालावधीत सुमारे १४ कोटी २५ लाख ४४ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून गार आणि बेटवाडीला विविध विकास कामांनी नटवले आहे.
तालुक्यातील गार-बेटवाडी ग्रामपंचायतीवर आमदार राहुल कुल यांचे वर्चस्व आहे. या ग्रामपंचायतचे सरपंच पद हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहे. आमदार राहुल कुल गटाकडून सरपंचपदी राणी सचिन भुजबळ या ओबीसी महिलाला संधी देण्यात आली होती. कुल गटाकडून त्यांना अडीच वर्षाची संधी देण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या एका ओबीसी महिलेला सरपंच पदाची संधी मिळावी असे ठरले होते.
तालुक्यातील काही ग्रामपंचायती आमदार राहुल कुल आणि काही ग्रामपंचायत माजी आमदार रमेश थोरात गटाचे वर्चस्व आहे. मात्र स्थानिक पातळीवर प्रत्येकाला सरपंचपदी संधी मिळावी यासाठी ठराविक कालावधी देण्याचे ठरवले गेले. तो शब्द पाळण्यासाठी काही त्याठिकाणी ग्रामदेवतेच्या शपथाही घेतल्या जातात. मात्र शपथा घेऊनही दिलेला शब्द पाळला जात नसल्याचे चित्र तालुक्यातील काही ग्रामपंचायत मध्ये पाहायला मिळत आहे.
त्याला अपवाद ठरल्या गार – बेटवाडी च्या सरपंच राणी सचिन भुजबळ! त्यांनी गट प्रमुखाला दिलेला शब्द पाळत दुसऱ्या एका महिलेला सरपंच पदी संधी मिळावी यासाठी आपल्या सरपंच पदाचा 3 फेब्रुवारीला राजीनामा दौंड पंचायत समिती कार्यालयाकडे दिला. २२ सप्टेंबर २०२२ ते ०३ फेब्रुवारी २०२५ या अडीच वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याचा प्रयत्न केला.
पारदर्शी आणि प्रामाणिक कारभार करत भुजबळ यांनी सरपंच पदाला योग्य न्याय दिल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. त्यांनी आपल्या कार्य काळात ऑनलाईन ओपन टेंडर पद्दत वापरून ग्रामपंचायतीची लाखो रुपयांची बचत केली. तसेच त्यांनी दर्जेदार रस्त्यांचे जाळे निर्माण करून गावच्या विकासात मोलाचे योगदान दिले. योग्य आणि जनयोजना राबवुन कर्मचारी वेतन, साहित्य खरेदी व्यवहार, जमा-खर्च यांत सुसूत्रता आणली.
महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याच कार्यकाळात १३० ते १३५ गोर गरीब आणि वंचित लाभार्थीना घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला. गावाच्या राजकारणाला सकारात्मक दिशा देण्याचे काम केले. कोणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतंत्र विचाराने गावकारभार करता येऊ शकतो हे त्यांनी आपल्या कामातून दाखवून दिले. ग्रामपंचायतीची विस्कटलेली आर्थिक घडी बसवून आर्थिक व्यवहार सुरळीत केले.
ऑनलाईन ओपन टेंडर करणे, पिण्याच्या पाण्याचे सुयोग्य नियोजन, सांडपाणी व्यवस्थापन, स्वच्छता, रस्त्यांची कामे, अशी उल्लेखनीय कामे करत स्वतः आदर्श होण्यापेक्षा गाव आदर्श होईल यादृष्टीने प्रयत्न केले. आमदार राहुल कुल यांच्या मुळेच सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळाली असली, तरी त्यांनी सरपंच पदावर विराजमान झाल्यावर त्यांनी गटातटाचे राजकारण न करता केवळ सर्वसामान्यांना केंद्र बिंदू मानुन विकास कामाला प्राधान्य दिले.
या विकासकामांमध्ये नवीन गार ते रेल्वे गेट रस्ता, अष्टविनायक रस्ता ते शितोळे वस्ती, बेटवाडी येथील होलेवस्ती रस्ता करणे, गार येथील बेटवाडी ते शितोळे वस्ती रस्ता सुधारणा, बालाजी मंगल कार्यालय ते पोळेकर वस्ती रस्ता, पेंना सिमेंट कंपनी ते सुर्वे वस्ती रस्ता, भोसले वस्ती रस्ता, बेटवाडी येथील होलेवस्ती बंधारा बांधकाम, गार येथील कुमार सुर्वे घर ते कानगाव रस्ता,
बेटवाडी होले मळा जिल्हा परिषद शाळा नवीन दोन वर्ग खोल्या बांधकाम, बेटवाडी येथील नारायण क्षिरसागर घर ते स्ममशान भूमी रस्ता, नवीन गार येथील समाज मंदिर ते सुभाष कांबळे घर रस्ता, बेटवाडी येथील ओढ्यावरील पूल व रस्ता, नवीन गार येथील धावडे वस्ती कॅनल रस्ता, नवीन गार येथील स्मशानभूमीचे बांधकाम, बेटवाडी येथील भुजबळ वस्ती ते गाढवे वस्ती रस्ता, बेटवाडी स्मशान भूमी परिसर सुधारणा, नवीन गार अण्णाभाऊ साठे नगर येथील पेव्हर ब्लॉक आदी विविध प्रलंबित विकासकामे मार्गी लावली.
दरम्यान , गार बेटवाडी गावचा लोकाभिमुख विकास कामे करून सरपंच पदाला योग्य न्याय दिल्याचे समाधान आहे, अधिकचा कालावधी मिळाला असता तर उर्वरित कामे मार्गी लावली असती. मात्र दुसऱ्या महिलेलाही संधी मिळणे आवश्यक आहे. सर्वांना विश्वासात आणि सोबत घेऊन विकास कामे केल्याचा आनंद आहे. अशी प्रतिक्रिया सरपंच राणी भुजबळ यांनी दिली.











