दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई, दि. १७ : परीक्षेला झालेला उशीर, घाटात लागलेले ट्रॅफिक आणि वेळेचा अभाव अशा परस्थितीत अडकलेल्या समर्थ महांगडे या विद्यार्थ्याला गोविंद येवले यांनी चक्क पॅराग्लायडिंगच्या साह्याने परीक्षा केंद्रावर पोहचविले.
त्याचे झाले असे की, पसरणी येथील समर्थ महांगडे हा बी. कॉम.च्या पहिल्या वर्षात शिकणारा विद्यार्थी. त्याचा एक पेपर पुढे ढकलण्यात आला होता. महाविद्यालयाने रिसीट अपडेट करून घेण्यास सांगितले होते. परंतु समर्थ ते विसरला. त्यामुळे परीक्षेचा निश्चित दिवस व वेळ त्याला समजली नाही. तो मित्रांसमवेत पांचगणीला कामानिमित्त गेला होता.
त्यावेळी अचानक त्याच्या मित्राने त्याला फोन करून आज पेपर असल्याचा व परीक्षा सुरु होण्यास काही वेळच शिल्लक असलाचे सांगितले. त्यामुळे समर्थवर प्रचंड मानसिक दडपण आले. घाटाला वाहनांच्या लागलेली रांगा डोळ्याने दिसत होत्या. अशा परस्थितीत घरी पोहचून घरून रिसीट, परीक्षेचे साहित्य घेवून वेळेत महाविद्यालयात पोहचणे अशक्य वाटत होते.
थापा (हॅरिसन फॉली ) येथे पसरणी येथीलच गोविंद येवले हे पॅराग्लायडिंगचा व्यवसाय करतात. समर्थने गोविंद सरांना आपली अडचण सांगितली. गोविंद यांनी पॅराग्लायडिंगच्या साहाय्याने त्याला पाच मिनिटात पसरणी येथील ग्राउंडवर पोहोच केले. समर्थने मित्राला फोन करून अगोदरच आपले परीक्षेचे साहित्य ग्राऊंडवर आणण्यासाठी सांगितले होते.
त्याचे मित्र ग्राऊंडवर दुचाकीसह तयारच होते. समर्थने क्षणाचाही विलंब नं करता दुचाकीने परीक्षा केंद्र गाठले. अगदी शेवटच्या काही मिनिटात तो परीक्षा हॉलमध्ये दाखल झाला. याबाबत जी. पी. ऍडव्हान्चर. प्रा. ली. चे मालक गोविंद येवले म्हणाले, गावातील तरुण मुलगा परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून त्याला थोडीशी मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याला वेळेत पोहचता आले याचे समाधान वाटते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वांना ही घटना माहित झाली. यात कोणताच प्रसिद्धीचा स्टंट नव्हता. समर्थ अतिशय साध्या घरातील हुशार विद्यार्थी आहे. त्याला मदत झाली एवढेच.











