माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवणार का?सुप्रिया सुळे म्हणाल्या, कुठलाही पक्ष म्हणून आम्ही लढू इच्छित नाही, पण शेतकरी लढायला तयार असतील, तर…
विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : नुकतीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे थोड्याच दिवसात माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुक दुरंगी होणार की तिरंगी याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
याबाबत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर असताना पत्रकारांनी माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढवणार का?असा प्रश्न विचारल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी स्वतः त्यामध्ये उतरणार नाही. पण अनेक शेतकरी अस्वस्थ आहेत. अनेक शेतकरी मला सकाळी भेटायला आले होते.
शेतकऱ्यांची जर कृती समिती असेल तर मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहील. बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून ती माझी नैतिक जबाबदारी आहे, मला माळेगाव सहकारी साखर कारखान्यात राजकारण आणायचं नाही. काही गोष्टीत आपण राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे. कुठलाही पक्ष म्हणून आम्ही लढू इच्छित नाही. तिथल्या शेतकऱ्यांना जर वाटत असेल की, आपल्यावर अन्याय झाला आहे व शेतकरी जर लढायला तयार असेल तर शेतकऱ्याच्या बाजूने पूर्ण ताकदीने त्यांच्याबरोबर आहे असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
एकंदरीत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत शेतकऱ्यांचा पॅनल म्हणून उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत विरोधकांचे दोन पॅनल होणार का? की सध्या महायुती असल्याने कारखान्यातील पारंपारिक विरोधक असलेले माजी अध्यक्ष रंजन तावरे, ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे हे नेमके काय भूमिका घेणार? यावरच ही लढत दुरंगी की तिरंगी हे ठरणार आहे.











