सुनीलकुमार मुसळे, (स्वीय सहायक, उपमुख्यमंत्री अजित पवार)
खासदार सुनेत्रा दिदी यांचा काटेवाडी ग्रामस्वच्छता अभियानापासून सुरु झालेला सामाजिक कामाचा प्रवास आता राज्यसभा तालिका अध्यक्ष असा प्रवास खूप अभिमानस्पद आहे.
सामाजिक सांस्कृतिक राजकीय वारसा असलेले माहेर आणि त्याच तोलामोलाचे सासर त्यांना मिळाले. वडील बाजीराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक, मराठवाडा मुक्तीसंग्रामातील त्यांचा सक्रिय सहभाग, आणि नंतरच्या काळात तेर परिसरातील अनेक गावाचं त्यांनी स्वीकारलेले अनभिषिक्त पालकत्व,हा सगळा समृद्ध वारसा त्यांनी पुढे चालवावा असे त्यांचे भाऊ अमरकाका यांना वाटतं असे. मी अमरकाकांचा जवळचा स्नेही, त्यामुळे मलाही तसेच वाटतं होते..
दीदीनी त्यांच्या गावात काटेवाडीत ग्रामस्वच्छता चळवळ सुरु केली. ग्रामस्वच्छता अभियानमध्ये त्यांच्या प्रेरणेने काटेवाडीतील प्रत्येक घरातील माणूस सहभागी झाला. आणि राज्यात, देशात अगदी आशियायी राष्ट्रातही त्यांचा गवगवा झाला, कौतुक झाले.
एका समृद्ध घरातील माहेरवासिनीचा सामाजिक कार्याचा श्रीगणेशा झाला. त्यांनंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. बारामतीला अनेक सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रम झाले, त्यात त्यांचा अग्रस्थानी पुढाकार राहिला. अनेक कार्यक्रमाची संपूर्ण राज्यात चर्चा झाली.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा प्रत्यक्ष राजकारणात प्रवेश झाला. त्याअगोदर पवार कुटूंबातील निवडणूक लढवणाऱ्या सर्व सदस्यांच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्या अग्रेसर राहत होत्या. प्रत्येकाच्या विक्रमी विजयात त्यांचा सहभाग होताच. त्यांचा स्वतः राजकीय प्रवेश लोकसभा निवडणुकीत झाला. या निवडणुकीत दुर्दैवाने त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर खचून न जाता त्या जनसेवेत राहिल्या.
नंतर काही दिवसांनी त्यांना राज्यसभा हा उच्च सभागृहात जाण्याची संधी मिळाली. त्या राज्यसभा खासदार झाल्या. त्यांच्या टीममध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला त्यांच्या कामाची कुठंतरी नोंद घेतली याचा आनंद वाटला.काटेवाडीच्या प्रत्येक माणसाला आपणच खासदार झालो असं वाटू लागलं. स्वच्छ आणि सुंदर काटेवाडी व्हावी म्हणून पहाटे पाच वाजता हातात खराटा घेऊन सर्वात पूढे असलेल्या सुनेत्रादिदी आणि त्यांचे कष्ट आठवू लागले. त्यांना मिळालेल्या संधीमुळे भगवान के घर में देर है लेकीन अंधेर नही याचा प्रत्यय आला.
त्यांची राज्यसभा तालिका अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची बातमी आली आणि मन भरून आले. भारतातील सर्वोच्च सभागृहाच्या तालिका अध्यक्ष पदाच्या आसनावर त्यांनी विराजमान होणे, त्यांना त्या जागेवर बघणे हा तेरच्या माहेरवासिनीचा आणि काटेवाडीच्या सुनेचा सन्मान आहे.एका समृद्ध सासर आणि माहेरचा वारसा समर्थपणे सांभाळणाऱ्या लेकीसुनेला अशा आसनावर आरुढ होण्याचा मान मिळणे ही गौरवाची गोष्ट आहे. आम्हाला सुनेत्रादिदी यांचा अभिमान वाटतो.











