विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती तालुक्यातील मूर्टी गावानजिक झालेल्या अपघातात फलटण तालुक्यातील साखरवाडी गावचा प्रतीक अंतू मोरे या सोळा वर्षीय दहावीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचे दोन सहकारी गंभीर जखमी झाले रस्त्याने जाताना दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला.
प्रतीक मोरे हा दहावीच्या वर्गात शिकत होता. साखरवाडी गावातीलच शाळेत तो दहावीच्या येथेच शिकत होता. येत्या 21 फेब्रुवारीपासून दहावीची वार्षिक परीक्षा आहे. आज वर्गात दहावीचा निरोप समारंभ होता. हा निरोप समारंभ आटोपून प्रतीक आणि त्याचे दोन मित्र परीक्षेच्या अगोदर देवदर्शन करू म्हणून जेजुरीला निघाले.
जेजुरीला खंडेरायाचे दर्शन घेऊन हे तिघेजण मोरगावला मयुरेश्वराच्या दर्शनाला आले होते. गणपतीचे दर्शन घेतले आणि मधल्या मार्गाने मोरगाव वरून निघाले. मुर्टी गावातील आश्रमशाळेच्या नजीक दुचाकी आली असता ही दुचाकी घसरली. यात प्रतिकच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्याबरोबरचे इतर दोन मित्र देखील गंभीर जखमी झाले. दहावीच्या वर्गाचा निरोप घेता घेता जगाचाच निरोप घेणाऱ्या प्रतिकच्या अपघाती घटनेने सारा वर्ग ही शोकाकुल झाला आणि साखरवाडी गावावर शोककळा पसरली.











