राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १४ घरफोड्या करून दहशत माजवणाऱ्या अट्टल टोळीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आणि यवत पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले.
रोहित उर्फ पिल्या प्रविण पवार, (रा. आळंदी म्हातोबाची ता. हवेली जि.पुणे ), नितीन सुकराज भोसले, (वय ३१), रोहित राजेश काळे, (वय २२ दोघे रा. सुपा ता. बारामती जि. पुणे ), आयशाम विलास भोसले (रा. सुपा ता. बारामती जि.पुणे ) अशी या आरोपींची नावे आहेत.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोर नेवसेवस्ती येथे ( दि.२६) उत्तम शंकर नेवसे यांच्या घरामध्ये प्रवेश करून सुरा तसेच कोयत्याचा धाक दाखवून अनोळखी तीन इसमांनी घरातील कपाट ठेवलेले ३० हजार ०१७ रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
त्यानुसार यवत पोलीस ठाण्याचे पोलीस पथक व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खोर परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासून तपासाची चक्रे फिरवली. या गुन्हयातील आरोपी हे सोने विक्री करिता भांडगाव या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळताच यवत गुन्हे शोध पोलीस पथकाने सापळा रचून व वेशांतर करून तीन संशयितांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशी केली असता आणि पोलीसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. या आरोपींनी इतर आणखी १३ घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. तब्बल १४ घरफोडी आणि जबरी चोरी या टोळीने केल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्याकडून चोरीतील १२० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५ भार चांदीचे दागिने, ३० हजार १७ रुपये रोख रक्कम तसेच गुन्हयात वापरण्यात आलेली मोटारसायकल असा एकूण १२ लाख ३० हजार०१७ रुपये किंमतीचा मुददेमाल पोलिसांनी जप्त केला.
पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, बारामती विभागाचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माने, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, राहूल गावडे, पोलीस हवालदार संदीप देवकर, गुरुनाथ गायकवाड, अक्षय यादव, विकास कापरे, दत्ता काळे, महेंद्र चांदणे, रामदास जगताप, सुभाष शिंदे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, विजय कांचन, पोलीस शिपाई धिरज जाधव, मारूती बाराते, अमोल भुजबळ, मोहन भानवसे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.











