राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : मागील काही दिवसांपासून तालुक्यातील पाटस ग्रामपंचायत प्रशासन लोकवस्ती जवळ उघड्यावर गावातील घाण, प्लास्टिकचा केर कचरा आणुन टाकत आहे. त्यामुळे अखेर संतप्त महिला आणि नागरिकांनी कचरा टाकण्यासाठी आलेल्या कचऱ्याच्या घंटा गाड्या अडवून तो कचरा टाकण्यास तीव्र विरोध केला. लोक वस्तीजवळ असलेला हा कचरा डेपो त्वरित हलवण्याची मागणी आता नागरिकांनी केली आहे.
पाटस ते दौंड रस्त्यालगत काही अंतरावर असलेल्या अंबिकानगर, श्री नागेश्वर मंदिर परिसर , रोहिदास नगर, या लोकवस्ती जवळ पाटस ग्रामपंचायतीने गावातील केरकचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा व्यवस्थापन डेपो केला आहे. हा कचरा डेपो होऊ नये यासाठी त्यावेळी ग्रामस्थांनी तीव्र विरोध केला होता.
अर्थात ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने त्यावेळी दिले होते. मात्र ग्रामपंचायत प्रशासनांकडून या ठिकाणी घाण आणि प्लास्टिकचा केर कचरा उघड्यावर आणून टाकली जात आहे आणि तो जागेवरच जाळली जात आहे. परिणामी या परिसरातील अंबिकानगर , रोहिदास नगर तसेच नागेश्वर मंदिर परिसरात जाळण्यात आलेल्या केर कचऱ्याचे धुराचे लोट हवेत मोठ्या प्रमाणावर प्रदूषण करत आहेत.
परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी ऍड. रणजित भंडलकर यांनी दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, दौंड तालुका आरोग्य अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली होती. दौंड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत काळे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला हा कचरा डेपो त्या ठिकाणाहून त्वरित हटविण्याच्या सुचना केल्या होत्या. ग्रामसभेतही त्या ठिकाणचा कचरा डेपो हलवण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे.
मात्र तरीही ग्रामपंचायतीकडून याच ठिकाणी केरकचरा आणून टाकला जात असून कर्मचारी हा कचरा जाळत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. शनिवारी (दि.८) अंबिकानगर परिसरातील संतप्त महिला आणि नागरिकांनी कचरा टाकण्यासाठी आलेल्या घंटागाडी आणि कचऱ्याची वाहतूक करणारा ट्रॅक्टर अडवून त्या ठिकाणी कचरा टाकण्यासाठी तीव्र विरोध दर्शविला.
या ठिकाणी कचरा टाकू नये तसेच या ठिकाणचा कचरा व्यवस्थापन प्रकल्प त्वरित स्थलांतरित करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसे न झाल्यास या ठिकाणचा कचरा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून टाकला जाईल. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याचा खेळ करणे थांबवावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला.











