विक्रम वरे – महान्यूज लाईव्ह
बारामतीच्या अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या १७० एकर प्रक्षेत्रात होत असलेल्या १० व्या जगप्रसिध्द कृषिक प्रदर्शनात यंदा फुलशेतीच्या विविध छटा 16 ते 20 जानेवारी दरम्यान पाहायला मिळणार आहेत. परदेशी कटफ्लॉवरसह देशी फुलझाडांची विविध प्रात्यक्षिके फुल उत्पादकांसाठी भविष्याची दिशा ठरणार आहेत.
शारदानगरच्या या मातीत गेल्या काही दिवसांपासून जपान, जर्मनी आदी देशांत विकसित झालेल्या गजानिया, रुटबेकिया, पिटीलोटस, लिमोनियम, जिनिया आदी जातींच्या कटफ्लॉवरची बियाणे व रोपे लावली असून आता येथील फुलांचे ताटवे अगदी फुलून गेली आहेत. जगभरात वापरली जाणारी शोभिवंत कटफ्लॉवरची उत्पादने या ठिकाणी घेण्यात आली असून विविध परदेशी वाणांच्या शोभिवंत फुलझाडांची प्रात्यक्षिके याठिकाणी पाहायला मिळणार आहेत. ही फळझाडे शेतकरी बांधवांना भविष्यातील शेतीची दिशा ठरविण्यास मदतीची ठरतील अशी अपेक्षा आहे. एकाच ठिकाणी अनेक जातींची ही फुलझाडे पाहायला मिळणार आहेत.
शेवंतीच्या २९ प्रकारची फुलशेती
शेवंती फुलांमध्ये आणखीच मोहक आणि सर्वांच्याच पसंतीची, मात्र आतापर्यंत शेवंतीचे दोन तीन प्रकार पाहण्याची सवय असलेल्या आपणा सर्वांना २९ रंगाच्या शेवंतींनी फुललेले फुलांचे ताटवे या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. विविधरंगी फुलांची जणू बास्केटच या ठिकाणी शेतकऱ्यांना पाहायला मिळेल आणि येणाऱ्या काळात अशी वैविध्यपूर्ण फुलांची शेती केल्यास आश्वासक दर मिळण्यासही मदत होऊ शकते. शेवंतीची जगभरातील विविध प्रकारच्या वाणांची प्रात्यक्षिके या एकाच ठिकाणी उत्पादित करण्यात आली असून तब्बल २९ प्रकारच्या रंगीत व विविध वाणांच्या शेवंतीची प्रात्यक्षिके या ठिकाणी उभारण्यात आली आहेत. फुल उत्पादकांसाठी यंदाचे कृषिक एक वेगळी संकल्पना देणारे व भविष्यातील आश्वासक शेतीसाठी एक पर्वणी नक्कीच ठरेल.











