ज्ञानेश्वर रायते, बारामती
खरेतर मागील दोन दशकात फक्त ऋतुमानानुसार येणारी फळे किंवा भाजीपाला असा जो थाट होता तो संपला.. आता उन्हाळ्यातच कलिंगड, खरबूज किंवा काकडी मिळते असे नाही, तर ते वर्षभर उपलब्ध असतात.. फळेही सगळी वर्षभर मिळू लागली आहेत.. थोडक्यात पिकांचा एक बाज होता तो संपला, त्याला कारण शेतीतील अधुनिक तंत्रज्ञान.. मात्र या तंत्राच्या दुनियेतही देशी वाण जे आजवर आपले जवळचे असूनही त्याला आपल्या शेतीत स्थान नव्हते, ते देशी वाण पुन्हा अनुभवण्यासाठी बारामतीची माती सज्ज झाली आहे.
अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या १७० एकरावरील प्रात्यक्षिक प्रक्षेत्रात यंदाच्या कृषिक प्रदर्शनासाठी अशी न ऐकलेली, अनुभवलेली अशी पाहायला मिळणार आहे. याची देही याची डोळा आपल्याला हिरव्या मिरचीपेक्षा दहा पटीने अधिक तिखट असणाऱ्या काळ्या मिरचीचेही दर्शन होणार आहे. साधारणपणे तिखटपणाचा ३० ते ५० हजार एसएचयू युनिटपर्यंत गुणधर्म असलेली मिरची या ठिकाणी उत्पादित करण्यात आली असून आपल्याला आजवर हिरव्या रंगाच्या, फारतर काळोखी असलेल्या हिरव्या मिरच्या पाहण्याची असलेली सवय बदलून साधी मिरचीही रंगीत पाहण्याची सवय करावी लागेल. कारण ही पूर्णतः काळी मिरची आहे.
टोमॅटोचेही तसेच.. आपल्याला सुरवातीला कच्चा हिरवा टोमॅटो आणि नंतर तो लालेलाल झालेला असे पाहण्याची सवय आहे. मात्र एकदम काळा किंवा जांभळा टोमॅटो असतो असे सांगितले तर सहजासहजी कोणी विश्वास ठेवणार नाही आणि त्यातही असा काळा टोमॅटो हा आपला भारतीय वाण आहे असे म्हटल्यावर नाहीच नाही.. मात्र आपल्याकडीलच शेतकऱ्यांनी जपून ठेवलेली देशी वाणांची कितीतरी प्रकारची पिके बारामतीच्या मातीत उगवली आहेत. काळा टोमॅटो, खाचा असणारा टोमॅटो, हाताच्या मुठीसारखा आकार असणारा टोमॅटो, लंबगोलाकार टोमॅटो अशी २९ प्रकारची टोमॅटोची जात या ठिकाणी तुम्हाला याची देही याची डोळा पाहायला मिळेल. एवढेच नाही, तर काळा कांदा देखील शेतकऱ्यांच्या प्रतिक्षेत आहे.
आणखी एक महत्वाचे म्हणजे पॉलिहाऊस किंवा शेडनेटमध्ये पिकवल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचा दर्जा उच्चतम राखला जातो. मात्र उत्पादन खर्चात बचत करून स्टेजिंगच्या सहाय्याने टोमॅटोचे पीक खुल्या जागेतूनही अगदी ४० फूट उंचीपर्यंत घेऊन ते अधिक काळासाठी उत्पादन देणारे व अधिक उत्पादन देणारे ठरू शकते याचा प्रयोग या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल. टोमॅटोचे अधिक दर्जेदार व अधिक उत्पन्न देणारे पीक कमी उत्पादन खर्चात घेता येणारे हे प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहता येणार आहे.
याखेरीज देशी वाणांचे टोमॅटोचे २९ प्रकार या ठिकाणी पाहता येईल, या मध्ये काळ्या रंगाच्या किंवा जांभळ्या रंगाच्या वैविध्यपूर्ण टोमॅटोसह विविध आकारातील टोमॅटो उत्पादित होणारे देशी वाणही प्रत्यक्ष पाहता येतील.











