दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत वाई येथील तल जोशी विद्यालयाचा विद्यार्थी व ओम श्री सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन चा खेळाडू सार्थक सागर जाधव याने विजेतेपद पटकावले.
नाशिक येथे झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यामधून 144 राज्यस्तरीय स्तरावरचे खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये सार्थक याने 30 मीटर गटात 343 गुण आणि 20 मीटर गटांमध्ये 348 गुण मिळवत 691 गुणांची बरोबरी करून उत्कृष्ट कामगिरी केली. सर्व गटात त्याची उत्कृष्ट कामगिरी राहून त्याने विजेतेपद पटकावले, तर मिश्र दुहेरी मध्ये राशी गार्डे हिच्या समवेत कांस्यपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीमुळे जयपूर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे.
यापूर्वी सार्थक याने डेरवण येथे 3 ते 10 मार्च 2023 यादरम्यान पार पडलेल्या डेरवण युथ गेम्स 2023 मधील 14 वर्षाखालील मुलांच्या धनुर्विद्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावले होते. 2024 मध्येच महाड मधील बिरवाडी येथे झालेल्या 17 वर्षाखालील पहिल्या एकलव्य आर्चरी कॉम्पिटिशन मध्ये सार्थक ने सुवर्णपदक पटकावले होते.
महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशनच्या वतीने लातूर येथील जिल्हा क्रीडा संकुलात 21 ते 23 फेब्रुवारी 2023 दरम्यान महाराष्ट्र राज्य 21 वी सब ज्युनिअर राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा झाली होती. यामध्ये देखील सार्थक जाधव ने पहिला क्रमांक पटकावला होता. याखेरीज धाराशिव येथील येथील श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियमवर 17 ते 19 फेब्रुवारी 2023 मध्ये पार पडलेल्या राज्य शालेय धनुर्विद्या स्पर्धेत सार्थक जाधव ने सहभाग नोंदवला होता.
ओम श्री सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशन चे अध्यक्ष राजेंद्र ननावरे, वाईच्या तर्कतीर्थ लक्ष्मणराव जोशी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र कांबळे, क्रीडा प्रशिक्षक प्रताप यादव यांनी सार्थक ला मार्गदर्शन केले. सार्थक शालेय दशेत असल्यापासून धनुर्विद्या शिकत असून आता तो राज्य व राष्ट्रीय स्तरावर खेळू लागला आहे.











