विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
लोकसभा निवडणुका झाल्या असल्या तरी त्याची निकालाची चर्चा आजही रंगत आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटण्यासाठी बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी आलेल्या पक्षाचे आमदार उत्तमराव जानकर यांनी अजब दावा केला आहे. यामध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 232 नव्हे, तर फक्त 110 जागा निवडून आल्या आहेत आणि बारामतीत तर अजित पवारांचा 20000 मतांनी पराभवच झालेला आहे असा दावा केला आहे.
विधानसभा निवडणुकीत तब्बल दीडशे मतदारसंघात गडबडी झाल्या आहेत असा दावा जानकर यांनी केला. ते म्हणाले, सखोल माहिती घेतली तर हे लक्षात येईल की महायुतीचा फक्त 110 मतदारसंघातच खऱ्या अर्थाने विजय झाला आहे मात्र प्रत्यक्षामध्ये दीडशे पेक्षा अधिक मतदार संघामध्ये ईव्हीएम मशीन मध्ये गडबडी झाली आहे.
दोनास एक या प्रपोजल नुसार ईव्हीएम मध्ये गडबड झाली आहे असा दावा करत जानकर म्हणाले, एकट्या बारामतीचा जरी विचार केला तरी, अजित पवारांना जी एक लाख 80 हजार मते पडली आहेत, त्याला दोनास एक असे प्रपोजल केले तर युगेंद्र पवारांचे 80 हजार मते अधिक 60000 मते वाढतात. म्हणजेच अजित पवारांची 60000 मते कमी होतात. तो विचार करता अजित पवारांना फक्त एक लाख वीस हजार मते मिळाली. मात्र प्रत्यक्षात ईव्हीएम मधील गडबडीमुळे ही मते एक लाख 80 हजार तयार झाली, म्हणजेच अजित पवारांचा वीस हजार मतांनी पराभव झाला आहे.
जानकर असेही म्हणाले, अजितदादांचे फक्त 12 आमदार, एकनाथ शिंदे यांचे 18 तर भाजपाचे 77 आणि त्यांना पाठिंबा देणारे तीन अपक्ष असे केवळ 110 आमदार निवडून आलेले आहेत. मात्र त्यांचा जो 232 आकडा दिसतो आहे, तो असाच गडबडीमुळे झालेला आहे. आणखी एका अभ्यासानुसार जयकुमार गोरे यांच्या बाबतीत विचार करायचे झाले, तर त्यांना एकास पाच असे प्रपोजल तयार केले होते. घार्गे यांना एक लाख तीन हजार मते मिळाली, तर गोरे यांना एक लाख 48 हजार मते मिळाली घार्गे यांची देखील 30000 मते चोरली गेली आहेत. त्यामुळे घार्गे 1 लाख 33 हजारावर , तर गोरे 1 लाख 21 हजारांवर येतात.











