दौलतराव पिसाळ : महान्यूज लाईव्ह
वाई : गेल्या एका वर्षात सातारा पोलिसांनी तब्बल 107 पिस्तूल, चार बंदूका आणि अनेक काडतुसे आतापर्यंत जप्त केली आहेत. पोलिसांनी काल देखील सराईत आरोपी कुणाल सकटे याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे असा ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
याबाबत वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वाई पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस उपअधिक्षक श्याम पानेगांवकर यांना वाई शहरातील रविवार पेठ मधील मांग खळी येथे एक जन विनापरवाना पिस्तूल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी वाईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे फौजदार सुधीर वाळुंज व त्यांच्या पथकाला सूचना केली.
माहितीची शहानिशा गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवार पेठेत मांगखळी येथील मणेश्वर ओढ्याजवळ सापळा लावला असता, सदर ठिकाणी एक इसम हा संशयित रितीने फिरताना दिसला. त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव कुणाल सकटे (रा. रविवार पेठ वाई, ता. वाई जि सातारा ) असे असल्याचे सांगितले. त्याच्यावर
यापूर्वी देखील गुन्हा दाखल असल्याने तपासपथकातील अधिकारी व अंमलदारांनी पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली.
तेव्हा त्याच्या कमरेला १ देशी बनावटीचे पिस्टल अडकवलेले व त्याचे पॅन्टच्या खिशात २ जिवंत काडतुसे असा एकूण ६५ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला. हे पिस्तूल त्याचेकडुन हस्तगत करण्यात आले.
सातारा जिल्हा पोलीस दलाकडून नाव्हेंबर २०२२ पासुन ते आजअखेर १०७ देशी बनावटीची पिस्टल, ४ बारा बोअर बंदुका, २३५ जिवंत काडतुसे, ३८३ रिकाम्या पुंगळ्या व ४ मॅगझीन जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्याम पानेगांवकर, सहायक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, तपासपथकाचे प्रमुख फौजदार सुधीर वाळुंज, फौजदार ए. बी. सुर्वे, पोलीस अंमलदार प्रसाद दुदुस्कर, नितीन कदम, राम कोळी, हेमंत शिंदे, श्रावण राठोड, विशाल शिंदे यांनी केली.











