बारामती : महान्यूज लाईव्ह
जीएसटी विभाग पुणे, बारामती चार्टर्ड अकाउंटंट अससोसिएशन, व्यापारी महासंघ बारामती, बारामती इंडस्ट्रियल डेव्हलोपमेंट अससोसिएशन, दि बारामती मर्चंट्स अससोसिएशन व रोटरी क्लब ऑफ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वस्तू व सेवा कर अभय योजना 2024 या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत व्यापारी व उद्योजकांना अभय योजने संदर्भात त्याच्या फायदे, पात्रता निकष, नोंदणी प्रक्रिया, अटी व शर्ती आणि योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या सुविधांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
वस्तू व सेवा कर विभाग पुणे येथील अप्पर आयुक्त संजीव पाटील, सह आयुक्त डॉ. राजेंद्र कुऱ्हाडे, राज्यकर उपायुक्त अजय नेवसे यांनी GST अभय योजनेसंदर्भात उपस्थितांचे मार्गदर्शन व शंका समाधान केले. सदरच्या कार्यक्रमासाठी राज्यकार अधिकारी तुषार आंबेडे, अभिजित गायकवाड, सुधीर अडसूळ हे उपस्थित होते.
सदर सेमिनारमध्ये सहभागी व्यापारी व उद्योजकांना GST कायद्यातील विविध अडचणी, जसे की VAT व Service Tax चे GST मध्ये ट्रान्सफर करताना आलेल्या समस्यांचा सामना, GST कौन्सिलचे कायद्यातील वेगवेगळे बदल, आणि प्रारंभिक काळात झालेल्या क्लेरिकल चुकांमुळे व्यापाऱ्यांना आलेल्या नोटिसांविषयी सुस्पष्ट माहिती मिळाली. या योजनेद्वारे सरकार व्यापाऱ्यांना दिलासा देणार आहे आणि वर्ष २०७-१८, २०१८-१९, २०१९-२० या काळातील त्रुटी सुधारण्यासाठी एकमेव संधी असल्याचे सांगण्यात आले.
संपूर्ण कार्यशाळा ही व्यापारी व उद्योजकांसाठी एक सुवर्ण संधी ठरली, जिथे त्यांना जीएसटी कायद्यातील विविध सुधारणा, दंड व कराच्या नोटिसांवर उपाय आणि योजनेच्या अंतर्गत मिळणाऱ्या सुटीवर सखोल माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी श्री. प्रशांत सातव यांनी विशेष सहकार्य केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चार्टर्ड अकाउंटंट नवनाथ साळुंखे यांनी केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक दोशी यांनी केले. या कार्यक्रमासाठी सुशील सोमाणी, धनंजय जामदार, संभाजी किर्वे, अरविंद गरगटे, प्रीतम पहाडे व बारामती शहरातील चार्टड अकाउंटंट्स, कर सल्लागार तसेच सर्व व्यापारी व उद्योजक उपस्थित होते. सी ए गिरीश सातव यांनी भविष्यात अशी आणखी सेमिनार आयोजित करण्याची ग्वाही दिली. GST अभय योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी या हेल्पलाईन क्रमांक ०२०-२६६०९१४० वर संपर्क साधू शकता.











