पुणे : महान्यूज लाईव्ह
घटना पुण्यातील, कोरेगाव पार्क परिसरातील..! कर्वेनगर येथे राहणाऱ्या एका 56 वर्षाच्या नागरिकाला शेअर मार्केट मधून उत्तम कमाई करून देतो लोणावळ्यात फार्म हाऊस साठी जागा विकत देतो असे सांगत डबल एक कोटी बारा लाख रुपयांची फसवणूक केली याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निशून राधेश्याम पटेल, मधुबाला राधेश्याम पटेल (दोघेही रा. गुरुदत्त अभिनव कोरेगाव पार्क) तर विवेकानंद देवेन शेनॉय (रा. पॉप्युलर हाइट्स बर्निंग घाट रोड कोरेगाव पार्क) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची ही घटना तब्बल एक वर्ष सुरू होती. मार्च 2023 ते 18 डिसेंबर 2024 दरम्यान या फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत.
पोलिसांच्या फिर्यादीनुसार या जेष्ठ नागरिकाशी पटेल दांपत्याने मैत्रीचे संबंध ठेवले. त्यांचा विश्वास संपादन करत शेअर मार्केटमध्ये खूप पैसे मिळतात असे सांगितले. त्याचबरोबर लोणावळा येथे फार्म हाऊस साठी कमी किमतीत जागा मिळते ती तुम्हाला विकत घेऊन देऊ असे आश्वासन देत त्यांच्याकडून वेळोवेळी एक कोटी बारा लाख 50 हजार रुपये घेतले.
मात्र एवढे पैसे घेऊनही शेअर मार्केटचेही पैसे मिळाले नाहीत आणि लोणावळ्यातील जागाही विकत दिली नाही, मुळात शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक झालीच नाही, तसेच जेष्ठ नागरिक वापरत असलेली गाडी हे दांपत्य स्वतःच घेऊन गेले. या सगळ्या गोष्टीमुळे आपली फसवणूक झाली याची पक्की खात्री झाल्याने त्या ज्येष्ठ नागरिकाने पोलिसात धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास फौजदार दीपक जाधव करत आहेत.











