नागपूर : महान्यूज लाईव्ह
राम शिंदे सभापती झाले म्हणून बरे झाले.. ते निवडून आले असते ना, तर गिरीश महाजन यांचेच अवघड झाले असते..! विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची एकमताने निवड झाल्यानंतर सभापतींचे कौतुक करताना जी भाषणे झाली, त्यामध्ये अजित पवारांनी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्यावर शेरेबाजी करत जोरदार टोलेबाजी केली.
भाजपचे राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाली. त्यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडल्यानंतर विधान परिषदेचे सदस्य मनीषा कायंदे, शिवाजी गर्जे, ज्ञानेश्वर म्हात्रे, अमोल मिटकरी यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले. आवाजी मतदानाने राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि अजित पवार यांची भाषणे झाली.
यादरम्यान अजित पवारांनी राम शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख केला. रोहित पवारांच्या विरोधात लढत असलेल्या राम शिंदे यांच्यासाठी अजित पवार यांनी एकही सभा घेतली नाही आणि रोहित पवारांना फायदा झाला असा आरोप राम शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. ते वक्तव्य पुन्हा एकदा उच्चारत अजित पवार यांनी शेरेबाजी केली.
अजित दादा म्हणाले, जे झाले ते चांगले झाले. आता आपण सभापती झालात. जर तुम्ही निवडून आला असता, तर देवेंद्र फडणवीस यांनी तुम्हाला मंत्रीपद दिले असते आणि तुम्हाला जर मंत्रीपद दिले असते, तर गिरीश महाजन यांचे मंत्रीपद गेले असते असे म्हणत त्यांनी गिरीश महाजनांकडे वळून, गिरीश.. आता तरी सुधार.. आता तरी सुधार.. कट होता होता वाचलाय तू असे वाक्य वापरले आणि सभागृहात हास्याचा स्फोट झाला.











