डॉ. संदेश शहा, इंदापूर
फेडरेशन ऑफ बॉडी बिल्डींग अँड फिजीकल स्पोर्टस पुणे यांच्या मान्यतेने व पुणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या सहकार्याने इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांचे जन्मदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेमध्ये आकाश दडमल हा इंदापूर श्री २०२४ किताबाचा मानकरी ठरला.
शहा सांस्कृतिक भवन इंदापूर येथे भरतशेठ मित्र परिवाराच्या वतीने जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धा ५५ ते ८० किलो व त्यापुढील खुला वजनगट अशा एकुण सात गटामध्ये घेण्यात आल्या. यामध्ये ५५ ते ७० किलो गटातून नरेद्र वाल्हेकर हा विजेता ठरला, तर ५५ ते ८० व त्यापुढील खुला गट यामध्ये आकाश दडमल हा इंदापूर श्री २०२४ च्या किताबाचा मानकरी ठरला.
त्याला बक्षीस म्हणून रोख रक्कम १५ हजार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत अक्षय शिंदे हा बेस्ट पोजर किताबाचा मानकरी ठरला तर कमलेश आचरा हा मोस्ट इंम्पुड बॉडीबिल्डर किताबाचा मानकरी ठरला. धाराशिव येथून या स्पर्धेसाठी उपस्थित राहीलेला ज्ञानेश्वर जाधव हा (अपंग स्पर्धक) या स्पर्धेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
प्रत्येक गटातून पाच स्पर्धक विजेत्यांची निवड करण्यात आली. त्यातील विजेत्यांना एक हजार ते पाच हजार रूपये रोख बक्षीस, स्मृती चिन्ह आणी प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले. यामध्ये ५५ किलो गटात नामदेव गार्डे, ६० किलो बाळु काटे, ६५ किलो सचिन सावंत, ७० किलो मनोज वाल्हेकर, ७५ किलो आकाश दडमल, ८० किलो कमलेश आचरा व ८० किलो पेक्षा जास्त वजन गटात पुथ्विक जाधव हे प्रथम क्रमांकाचे विजेते ठरले. विजेत्यांना रोख पाच हजार रुपये, स्मृती चिन्ह व प्रशस्तिपत्र देवून गौरविण्यात आले.
भरत शहा यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये विविध भागात उस्फूर्तपणे वृक्षारोपण, मुलांना खाऊ वाटप यासह वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार जाधव, संचालक मधुकर भरणे, कर्मयोगी कारखान्याचे संचालक वसंत मोहोळकर, राहुल जाधव, किरण बोरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शहा यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.सुत्रसंचलन संतोष नरुटे यांनी केले.
संकर्षण कऱ्हाडे ठरला आकर्षण.
भरत शहा यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने निवेदक संकर्षण कऱ्हाडे यांच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला महिलांनी मोठी गर्दी केली होती.यामध्ये पैठणी व सोन्याची नथ च्या मानकरी शोभा गायकवाड, एलईडी टीव्ही च्या विजेत्या वर्षा भराटे, फ्रिजच्या विजेत्या पुजा करे व वॉशिंग मशीन च्या विजेत्या सुवर्णा आवटे ठरल्या. यासह जागृती बोरीकर, प्रियंका राखुंडे, शितल चोपडे, पूनम पवार, मनिषा साळवी यांनीही आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.
विजेत्यांना इंदापूरच्या नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा, श्री नारायणदास रामदास शहा चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त वैशाली भरत शहा, सायली शहा, शहा ग्लोबल स्कूलच्या संचालिका रुचिरा शहा यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी संकर्षण कराडे महिलांसह आबालवृद्ध नागरिक, युवक युवती यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. त्यांनी बहारदार कार्यक्रम सादरीकरण करून इंदापूरकरांची मते जिंकली. कार्यक्रमाचे नियोजन गणेश महाजन, अंगद शहा, प्रशांत उंबरे, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, बंडा चव्हाण, अजिंक्य जाविर, आरशाद सय्यद, अक्षय सूर्यवंशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.











