डॉ. संदेश शहा, इंदापूर
इंदापूर तालुक्यातील श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. फडणवीस सत्तेवर येताच आता परिसरातील अवैध माती, दारू, गांजा विक्री व मटक्याचे अवैध धंदे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद करावेत अशी नागरिकांनी मागणी केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र निरा नरसिंहपुर गावांमध्ये अवैधरित्या मातीचे उत्खनन चालू आहे. त्याचप्रमाणे दारू विक्री, मटका आणि गांजा विक्री देखील भरपूर प्रमाणात सुरू आहे. येथील अवैध व्यवसाय करणाऱ्या लोकांना वरदहस्त असल्यामुळे तसेच यामध्ये मोठे अर्थकारण होत असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील अवैध व्यवसायास तातडीने लगाम घालून हे अवैध व्यवसाय कायद्याने बंद करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
अवैध दारू विक्रीमुळे गावातील वातावरण हे दूषित होत असून त्यामुळे अनेक कौटुंबिक, सामाजिक प्रश्न निर्माण होत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना तसेच बाहेरून येणाऱ्या भाविकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील काही माती सम्राटांनी शेतातील अवैधरित्या मातीचे उत्खनन केलेले आहे, तसेच उत्खनन चालू आहे. तरी देखील प्रशासनाचे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष असून तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांनी येथे तातडीने भेट देऊन अवैध व्यवसायास लगाम लावणे गरजेचे आहे. तहसीलदार यांनी लक्ष घालून आत्तापर्यंत विक्री झालेल्या माती वरती व चालू असलेल्या विक्रीसाठी जी माती आहे त्याच्यावरती कार्यवाही करावी अशी जनतेतून मागणी आहे.
नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये आत्तापर्यंत गांजा विक्री संदर्भात बरेच गुन्हे दाखल झाले आहेत. येथे खुलेआमपणे गांजा विक्री केली जात आहे. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालून हा अवैध प्रकार थांबवला पाहिजे. गांजा विक्रीमुळे युवा पिढी बरबाद होत आहे त्यामुळे गांजा विक्री वरती बंदी आली पाहिजे.
नीरा नरसिंहपूर परिसरामध्ये मटक्याचा व्यवसाय तेजीत असून अगदी लहान मुलांपासून जेष्ठ व्यक्तीपर्यंत लोकांमध्ये मटक्याचे व्यसन लागले आहे. अवैध मटका व्यावसायिक यांच्यावर वरदहस्त कुणाचा आहे याची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. माती विक्री, दारू विक्री, मटका त्याच प्रमाणे गांजा विक्री यामुळे निरा नरसिंहपुर पवित्र तीर्थक्षेत्र असूनही अशा व्यवसायामुळे मलीन होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आता पोलिसांना व महसूल विभागाला नीट कामाला लावावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.











