राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश पवार यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी सभा होणार आहे. शेवटच्या क्षणी रमेश थोरात यांना उमेदवारी देऊन शरद पवारांनी एकतर्फी होणारी दौंड ची विधानसभा पुन्हा एकदा कडवे आव्हान देऊन दुरंगी केली. त्यामुळे आज होणाऱ्या शरद पवार यांच्या सभेकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
ते नेमकं काय बोलणार आणि कोणावर निशाणा साधणार? याकडे विरोधकांचेही लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी संपण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. या दोन दिवसांत राज्यातील मातब्बर नेत्यांच्या प्रचाराच्या सांगता सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दौंड विधानसभेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश थोरात यांच्या प्रचाराची सांगता सभा रविवारी ( दि १७) सायंकाळी ६ वाजता वरवंड येथील बाजार मैदानात होणार आहे
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज भुषणसिंहराजे होळकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या निवडणूकीत भाजप आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात यांच्यात थेट लढत आहे. मागील महिनाभरापासून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, टीका टिप्पणी सुरू आहे.
खासदार अमोल कोल्हे यांची केडगाव येथील सभा गाजली. कोल्हे यांनी आमदार कुल यांचे नाव न घेता टिका केली. तर दौंड शहरात खासदार निलेश लंके यांनी ही आमदार राहुल कुल यांच्या कारभाराचा चांगलाच समाचार घेतला होता. या टिकेला महायुतीचे उमेदवार राहुल कुल यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या शब्दात उत्तर दिले. आता वरवंड येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभा होणार आहे. शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अद्याप पर्यंत राहुल कुल आणि कुल कुटुंबावर कसलीही टिका केली नाही.
मात्र आजच्या सांगता सभेत ते नेमकं काय बोलतील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे, मतदारांचे आणि विरोधकांचेही लक्ष लागले आहे. ही सभा रमेश थोरात यांच्यासाठी महत्त्वपूर्ण कलाटणी देणारी ठरु शकते. या सभेला तालुक्यातील मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी महाविकास आघाडीकडून तयारी सुरू आहे.











