बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामतीचे पवार आणि कण्हेरीचा मारुतीराया हे निवडणुकीच्या काळातील पारंपरिक चित्र. गेल्या वर्षापर्यंत एकच नारळ फुटायचा. आता मात्र समोरासमोर पवार कुटुंब असल्याने याच मारुतीरायाला दोघांचेही नारळ फुटायला सुरुवात झाली आहे. लोकसभेच्या वेळी मारुतीराया कोणाला पावणार अशी चर्चा होती; अगोदर सुप्रिया सुळेंनी नारळ फोडला होता, तो सुप्रिया सुळेंना पावला, अर्थात सुनेत्रा पवारांनीही नारळ फोडला होता, मग त्यांना काही दिवसातच राज्यसभा देखील मिळाली; आता विधानसभेची बारी आहे!
पुन्हा एकदा कन्हेरीचा मारुतीराया कोणाला पावणार?अशी चर्चा आता विधानसभेत देखील आहे. गंमत म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज म्हणजे सोमवारी प्रचाराची सुरुवात करण्याचे ठरवले. दुसरीकडे याचदिवशी त्यांचे प्रतिस्पर्धी असलेले सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचाही उमेदवारी अर्ज भरण्याचा दिवस ठरला. अजित पवारांच्या नियोजनानुसार सकाळी बारामतीतून रॅली, त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करायचा आणि मग कन्हेरी येथील मारुतीरायाला प्रचाराचा नारळ फोडून सभा घ्यायची असे नियोजन होते.
दुसरीकडे युगेंद्र पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द शरद पवार साऱ्या गडबडीतून वेळ काढत बारामतीत पोचले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यादेखील पोहोचल्या आणि उमेदवारी अर्ज भरण्यासाठी युगेंद्र पवार यांच्या समवेत हे बापलेक निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोचले. तत्पूर्वी सकाळी साडेनऊ वाजता युगेंद्र पवार यांनी कन्हेरीचे मंदिर गाठले. तेथे मारुतीरायाला नमस्कार करत प्रचाराचा नारळ देखील फोडला. थोडक्यात मारुतीरायाकडे सर्वप्रथम साकडे योगेंद्र पवारांनी घातले.
अगोदर येईल त्याला प्राधान्य अशा तत्वानुसार मारुतीराया युगेंद्र पवारांना पावणार? की वर्षानुवर्ष नारळ फोडणाऱ्या अजित पवारांना याची उत्तर विधानसभेच्या निकालातून स्पष्ट होईल, मात्र बारामतीत पवारांच्याच घरात सुरू असलेली परस्परविरोधी निवडणुकांची धांदल मतदार याची देही याची डोळा पाहत आहेत. येत्या काही दिवसात प्रचाराच्या दरम्यान आताही आरोप प्रत्यारोपाची राळ उठेल, बऱ्याच गोष्टी बाहेर पडतील अशी मतदारांमध्येच चर्चा आहे.











