राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात राजकीय उलथापालथ होण्यास सुरुवात झाली आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपला रामराम ठोकत शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारीत प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली.
दुसरीकडे दौंड मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक माजी आमदार रमेश थोरात हे फक्त तुतारीकडून इच्छुक आहेत. ते मात्र अद्याप महायुतीतून बाहेर पडायला तयार नाहीत. ते अजूनतरी तळ्यात मळ्यातच आहेत. थोरात हे ठोस निर्णय घेत नसल्याने कार्यकर्तेही संभ्रमात आहेत. पुणे जिल्ह्यात महायुतीला विशेषतः भाजपला मोठा धक्का बसला आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करत भाजपच्या सर्व पदांचे राजीनामा देत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा करत आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे इंदापुरात महायुतीत उभी फूट पडली आहे. त्याचे पडसाद पुणे जिल्ह्यात उमटू लागले असून भाजप मध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या इंदापूर नंतर दौंडमध्ये महायुतीला राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे आणि तेही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना. अजित पवार यांचे खंदे समर्थक पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार रमेश थोरात यांनी आगामी दौंड विधानसभेसाठी रणसिंग फुंकले असून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे.
दौंड विधानसभा मतदारसंघ हा महायुतीतील भाजपला जाणार असून विद्यमान आमदार राहुल कुल यांनाच उमेदवारी मिळणार आहे. हे जवळजवळ निश्चित मानले जात आहे. त्यामुळे थोरात यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे तुतारी या चिन्हावरून उमेदवारी घेण्यासाठी इच्छुक असल्याचे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना जाहीर केले होते. मात्र ते केवळ तुतारी कडून इच्छुक असुन त्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडे अधिकृत उमेदवारी मागितलेली नाही.
खासदार सुप्रिया सुळे यांनीही रमेश थोरात यांचा उमेदवारी बाबत पक्षाकडे अर्ज आला नाही. असे स्पष्ट केले होते. थोरात हे फक्त तुतारीकडून उमेदवारी मिळावी यासाठी इच्छुक आहेत. मात्र ते महायुतीतून बाहेर पडायला तयार नाहीत. ते अजूनही दोन्ही डगरीवर हात ठेवून आहेत. त्यांनी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची गाठीभेटी घेतल्या नाहीत.
थोरात यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षात घेण्यास थेट नकार दर्शवला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे ते तुतारीकडून उमेदवारी नाही मिळाली, तर अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे वारंवार सांगत आहेत. थोरात यांची ठाम भूमिका स्पष्ट होत नसल्याने थोरात समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता असून ते संभ्रमात आहेत. काही कार्यकर्त्यांनी तर महायुतीतून बाहेर पडा असा सल्लाही दिला आहे. मात्र ते उपमुख्यमंत्री अजित पवार दौंड विधानसभा मतदारसंघाबाबत काय निर्णय घेतात याची वाट पाहत असावेत की काय ? अशी शंका राजकीय वर्तुळात कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.











