सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : भाजपाला रामराम केल्यानंतर काल शुक्रवारी हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर मध्ये कार्यकर्त्यांचा व पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा ठेवत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केला. मात्र प्रवेशाची तारीख वरिष्ठ नेते ठरवतील असे त्यांनी नमूद केले होते.
या पार्श्वभूमीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचे स्वागत करून तारीख व वेळ जाहीर केली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश सोमवारी (दि. 7 ) रोजी जाहीर केला आहे. जयंत पाटील यांनी तारीख व वेळ जाहीर करून हर्षवर्धन पाटील यांच्या पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब केलेले आहे.
राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात येण्याचा निर्णय घेतला, त्यांचे मी पक्षात मनापासून स्वागत करतो. असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ‘राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर येथे सोमवारी 7 ऑक्टोंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांचा पक्षप्रवेश होईल’ अशी माहिती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोशल मीडिया अकाउंटवरून दिली आहे.
सोमवारी होणारा हा पक्षप्रवेश इंदापूर शहरातील मार्केट कमिटीच्या मैदानात होणार आहे. त्या दृष्टीने पक्षप्रवेश सोहळ्याच्या तयारीची बैठक पार पडत आहे. इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी नागरिकांच्या प्रगतीसाठी 84 वर्षाच्या योद्ध्या ला साथ देऊया.. अशा आशयाचे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाचे बॅनर सोशल मीडियाच्या माध्यमातून झळकू लागले आहेत.











