राजेंद्र झेंडे,महान्यूज लाईव्ह
दौंड : दौंड विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेल्या माजी आमदार रमेश थोरात यांना दौंड राष्ट्रवादीकडून तीव्र विरोधानंतर महाविकास आघाडीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यामुळे रमेश थोरात यांचा महाविकास आघाडी कडून पत्ता कट झाल्याने ते आता अपक्षच उभे राहतील असे जवळजवळ निश्चित झाल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वीच दौंडमध्ये दिवसेंदिवस राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. काही दिवसांपूर्वी माजी आमदार रमेश थोरात यांनी आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तुतारी या चिन्हावर उभे राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तशी तयारीही थोरात यांनी केली होती.
त्यामुळे दौंड तालुक्यात हा चर्चेचा विषय बनला होता. तर महाविकास आघाडी विशेषतः दौंड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांमध्ये थोरात यांच्यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यामुळे रमेश थोरात यांच्या उमेदवारीला कडून विरोध झाला. लोकसभेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करणाऱ्या गद्दारांना उमेदवारी नको असा सूर निघू लागला आणि महाविकास आघाडीकडून आगामी विधानसभेसाठी वेगाने हालचाली सुरू झाल्या.
रविवारी (दि २२) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक दौंड येथे पार पडली. या बैठकीत दौंड विधानसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी एकत्रित कामाला लागा. निष्ठावंत कार्यकर्त्यांनाच पक्षाकडून उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे तयारीला लागा. अशी माहिती यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी दिली.
तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क अभियान राबवून व समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचण्यासाठी या अभियानाची सुरुवात पारगाव येथून २४ सप्टेंबर पासून होणार असून समारोप दौंड शहरात होणार आहे.
या बैठकीला महाविकास आघाडीतील शिवसेना जिल्हाप्रमुख शरद सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, दौंड शहर प्रमुख आनंद पळसे,आपचे रविंद्र जाधव, काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठल खराडे, शहराध्यक्ष हरिष ओझा, लोकजनशक्तीचे राहुल चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे प्रविण धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे अल्पसंख्याक विभागाचे सोहेल खान, रामभाऊ टुले, योगिनी दिवेकर, सचिन काळभोर, अजित शितोळे, चैतन्य पाटोळे, आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, डॉ.भरत खळदकर, डॉ. वंदना मोहिते, दिग्विजय जेधे आदी उपस्थित होते.











