इंदापूर : महान्यूज लाईव्ह
गर्भलिंग निदानासाठी अनेक कायदे कठोर केले, तरी गर्भलिंग निदान काही केल्या बंद होत नाही. इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे असाच एक प्रकार घडला असून, गर्भवती महिलेचा गर्भपात केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मुलीचा गर्भ असल्याने हा गर्भपात केल्याचे समजते, तसेच हा गर्भपात घरीच केल्याचे या महिलेच्या माहेरच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. ऋतुजा धोत्रे असे या विवाहित गर्भवती महिलेचे नाव असून तिचा मृत्यू झाल्याने तिचे नातेवाईक संतप्त झाले आहेत. फलटण तालुक्यातील पिंपरद गावचे या महिलेचे माहेर आहे.
तीन दिवसांपूर्वी या महिलेचा गर्भपात घरीच केल्यानंतर तिला त्रास होत होता. तिला त्रास वाढू लागला, मग माहेरच्या मंडळींना ही माहिती मिळाली, आज तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेनंतर इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे पोचलेल्या फलटण तालुक्यातील महिलेच्या माहेरच्या मंडळींनी इंदापूर पोलीसांना यासंदर्भात माहिती दिली.
पोलिसांनीही ही घटना गांभीर्याने घेतली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखत इंदापूर पोलीस ठाण्यात भेट दिली. दरम्यान या संदर्भात अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही, मात्र संध्याकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.











