ठाणे : महान्यूज लाईव्ह
बदलापूर मधील बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा आज पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारात एन्काऊंटर मध्ये मारला गेला. सांगितलं जातंय की, अक्षय शिंदे यांनी पोलीसाची बंदूक घेऊन पोलिसांवरच गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो मारला गेला आहे.
बदलापूरच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला पोलीस कोठडी वाढवून घेण्यासाठी नेले जात असताना हा प्रकार घडला. दरम्यान सुरुवातीला त्याने स्वतःवरच गोळ्या झाडल्या असल्याची व आत्महत्या केल्याची माहिती पसरली होती. मात्र नंतर पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे.
बदलापूरच्या भाजप नेत्याच्या एका शाळेत शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर याच शाळेत कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदे याने शाळेतच अत्याचार केला होता. याप्रकरणी पोलिसांनी अक्षय शिंदेला अटक देखील केली होती. या घटनेवरून संपूर्ण देशात प्रचंड संताप व्यक्त केला गेला. दरम्यान अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर राज्यातील राजकारण पुन्हा तापले असून, विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनामाची मागणी केली आहे.











