राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षफुटीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. यादरम्यानच्या काळामध्ये निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या गटाला पक्षाची मान्यता देऊन राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह देऊन टाकले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे कोर्टात गेले आहेत. त्याच्या तारखावर तारखा सुरू आहेत. याच दरम्यान आता शरद पवारांनी सुप्रीम कोर्टाकडे नवी मागणी केली आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांच्या पक्षाने घड्याळ हे चिन्ह वापरले. अर्थात सर्वोच्च न्यायालयाने हे चिन्ह वापरताना घड्याळ चिन्हाखाली निर्णय न्यायप्रविष्ठ असल्यासंदर्भातील वाक्य छापण्यास सांगितले होते. काही ठिकाणी ते छापले गेले, काही ठिकाणी छापले गेले नाही.
आता मात्र विधानसभा निवडणुकीआधी कोणत्यातरी एकाच गटाला चिन्हाचा फायदा नको, म्हणून एक तर विधानसभा निवडणुकीपूर्वीच घड्याळाच्या चिन्हाचा निर्णय घ्या, नाहीतर संबंधित चिन्ह गोठवून टाका अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. सध्या शरद पवारांचा पक्ष तुतारीवाला माणूस हे चिन्ह घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे. आता सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.











