नवी दिल्ली : महान्यूज लाईव्ह
शिवसेनेची आणि भाजपची युती का तुटली यासंदर्भात सातत्याने व वारंवार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे गृहमंत्री अमित शहांकडे बोट दाखवतात आणि मातोश्री मधील बाळासाहेबांच्या खोलीचा संदर्भ देतात. आता तर खुद्द महाराष्ट्रातील केंद्रीय मंत्र्यांनी भाजपला चिमटा घेत सबुरीचा सल्ला दिला आहे.
हे केंद्रीय मंत्री अर्थातच आहेत रामदास आठवले. आठवले यांनी अत्यंत मार्मिकरित्या या संदर्भात भाजपला आरसा दाखवत यातील भाजपचा तोटा दाखवून दिला आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात जर खरोखरच अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्री पद वाटून घेतले असते तर उलट भाजपच फायद्यात राहिले असते.
पदासंदर्भात जर बोलणी झाली असती, तर भाजपचा फायदा झाला असता, परंतु या सगळ्या गोंधळात अडीच वर्ष अगोदर उद्धव ठाकरे आणि त्यानंतरची अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांना म्हणजेच काहीही करून शिवसेनेलाच मुख्यमंत्रीपद मिळाले अशी आठवण करून दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबाबत सबुरीचे धोरण घेतले असते, तर भाजपला सुद्धा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मिळाले असते आणि उद्धव ठाकरे ही एनडीए सोबत राहिले असते तर धनुष्यबाण आणि पक्ष त्यांचाच राहिला असता अशी आठवण आठवले यांनी करून दिली आहे.
दरम्यान आपण भाजपने तीन वर्ष व शिवसेनेने दोन वर्ष मुख्यमंत्रीपद घ्यावे असा तोडगा सुचवला होता अशीही आठवण आठवले यांनी करून दिली आहे. सन 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या प्रस्तावाचा विचार भाजपने करायला पाहिजे होता अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायला हवे होते, अर्थात आता महायुती म्हणून आम्ही अधिक भक्कमपणे महाराष्ट्रात निवडणुकीला सामोरे जाऊ असे आठवले म्हणाले आहेत.











