बारामती : महान्यूज लाईव्ह
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळाली पाहिजे यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे प्रमुख भगवानराव वैराट यांच्या समर्थकांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीतील राष्ट्रवादी भवनात शक्तीप्रदर्शन करत घोषणाबाजीने दणाणून सोडले.
उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्यभरात सुरू असलेल्या जनसन्मान यात्रेमध्ये व्यस्त होते. आज बारामतीतील विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बारामतीत आले. अजित पवार आज बारामतीत येत आहेत, या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते पाटील यांच्या समर्थकांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या मोहिमेनुसार आज विश्वास देवकाते पाटील यांना विधान परिषदेची आमदारकीची संधी द्यावी या मागणीसाठी शक्तीप्रदर्शन केले.
दुसरीकडे गेल्या अनेक वर्षापासून झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणारे वाई तालुक्यातील बोपर्डी चे सुपुत्र भगवानराव वैराट यांच्या समर्थकांनी देखील विधान परिषदेच्या आमदारकीची संधी वैराट यांना मिळावी यासाठी आज राष्ट्रवादी भवन मध्ये शक्तिप्रदर्शन केले. दोघांचेही समर्थक आज कसब्यातील राष्ट्रवादी भवन मध्ये एकत्र आल्याने मोठी गर्दी झाली











