बारामती : महान्यूज लाईव्ह
आता पुणे व मुंबई या ठिकाणी उद्योजकांना जावे लागण्याची आता गरज राहणार नाही. कारण महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अर्थात एमआयडीसीचे प्रादेशिक कार्यालय आता बारामतीत होणार आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड, पुरंदर व इंदापूर या तालुक्यातील कार्यरत आणि प्रस्तावित असलेल्या उद्योगांशी संबंधित भूसंपादनाची कामे व इतर कामे या कार्यालयातून होणार आहेत. सोमवारी या कार्यालयाची बारामतीत सुरुवात होणार आहे.
9 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता बारामतीतील प्रादेशिक कार्यालय सुरू होणार आहे. पुढील आदेश येईपर्यंत या कार्यालयाचा अतिरिक्त कार्यभार एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सांभाळणार आहेत. या संदर्भातील आदेश एमआयडीसीचे महाव्यवस्थापक तुषार मटकर यांनी दिला आहे.
राज्य सरकारने नव्याने राज्यातील सात ठिकाणी प्रादेशिक कार्यालय कार्यान्वित करण्यासाठी निर्णय घेतला होता त्यानुसार बारामतीत हे कार्यालय होत आहे या संदर्भातील माहिती काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. बारामतीतील विविध उद्योगांच्या संघटनांनी या संदर्भात मागणी केली होती.
दरम्यान कार्यालयासंदर्भात महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड एग्रीकल्चर संस्थेचे विभागीय अध्यक्ष शरद सूर्यवंशी, बारामतीचे उपाध्यक्ष शिवाजी निंबाळकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले की, बारामतीत हे प्रादेशिक कार्यालय होणार असल्यामुळे चार तालुक्यातील उद्योजकांची सर्व कामे या कार्यातून होतील. त्यामुळे उद्योजकांचा वेळ, पैसा याची बचत होणार असून उद्योगाशी निगडित कामांचा निपटारा वेळेत होऊन उद्योगवाढीसाठी त्याचा फायदा होईल. त्यामुळे हे कार्यालय अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल असा आम्हाला विश्वास असल्याचे ते म्हणाले.
या संदर्भात बारामतीतील इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनीही या कार्यालयाचे स्वागत केले आहे. या कार्यालयामुळे महत्त्वाच्या कामांचा निपटारा होईल व उद्योजकांसाठी हे कार्यालय महत्त्वाची भूमिका बजावेल, भूसंपादनाच्या कामासाठी पुणे अथवा मुंबई या ठिकाणी उद्योजकांना सतत जाण्याची आता वेळ येणार नाही असे मत व्यक्त केले आहे.











