बारामती : महान्यूज लाईव्ह
बारामती शहरालगत मोठ्या होर्डिंगवर भारतीय जनता पक्षाने देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो छापला. मात्र बारामतीचेच लोकप्रतिनिधी व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मात्र फोटो वगळला आहे. राज्यात महायुती असली तरी बॅनरवर मात्र महायुती स्पष्ट होत नाही असे अनेक तालुक्यांमध्ये घडते आहे.
बारामती शहरालगत एक होर्डिंग भारतीय जनता पक्षाच्या समर्थकांनी उभा केले असून यामध्ये मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण योजनेचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना देताना देवाभाऊ हा शब्द मोठ्या आकारात छापून त्याच्यापुढे कमळाचे चिन्ह देण्यात आले आहे. तर लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला अशी टॅगलाईन देऊन भारतीय जनता पक्षाने किंवा पक्षाच्या समर्थकांनी हा फलक उभा केल्याचे दिसत आहे.
अर्थात बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाने जनसन्मान यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लेक्स फलक उभे केले होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ऐवजी फक्त माझी लाडकी बहीण असे योजनेचे नाव त्यांच्या फ्लेक्स फलकावर लावले होते. असे अनेक फ्लेक्स फलक बारामतीत झळकले. त्याची चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झाली.
आज बारामतीत उभारण्यात आलेला हा फलक म्हणजे राष्ट्रवादीला फिट्मफाट केल्याचा परिपाक असल्याची खोचक टीका सोशल मीडियावर केली जात आहे. या फ्लेक्स फलकावर बारामतीचेच आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच ही योजना जाहीर करणारे अर्थमंत्री म्हणून आणि महायुतीतील घटक पक्ष म्हणून अजित पवारांचाही फोटो येणे अपेक्षित होते, मात्र या फलकावर हा फोटो झळकलेला नाही.











