राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांचे चुलते रंगनाथ माधवराव मुसळे यांचे आज निधन झाले. आपल्या चुलत्याप्रती आपल्या भावना सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. चुलते रंगराव मुसळे यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक देणारी ही पोस्ट पोलीस अधिकाऱ्यांप्रती प्रत्येकाला आदर वाटावा अशीच आहे. मुसळे यांनी लिहिलेला लेख जसाच्या तसा पुढील प्रमाणे..!
महाराष्ट्राच्या पोलीस खात्याला अभिमान वाटावा अशी कामगिरी माझ्या चुलत्यांनी केली. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रंगनाथ माधवराव मुसळे. धाराशिव जिल्ह्यातील गंधोरा गावचे सुपुत्र रंगनाथ मुसळे यांनी आज जगाचा निरोप घेतला आणि माझ्या मनात आठवणींचे काहूर दाटले.
आमच्या घराचा नाही, तर गावाचा ढाण्या वाघ आज आम्हाला सोडून गेला. त्यांच्या अनेक आठवणी आणि कर्तव्यनिष्ठा याबद्दल सांगता येईल. मंडल आयोगाची आंदोलन सुरु असताना त्यांनी एकट्याने एक दंगल रोखली होती. राज्यातील पहिले नक्षलविरोधी पथक त्यांच्या नेतृत्वाखाली निर्माण झाले. ही दोन ठळक कामे त्यांच्याबद्दल सांगता येतील. कुस्तीच्या आवडीतून कमावलेले शरीर त्यांनी देशसेवा करण्यासाठी खर्च केले.
आमचे पूर्वसुरी आणि ज्यांना शाहूराजानी गौरवले होते ते व्यंकटराव बाबाजी मुसळे हे महान मल्ल. त्यांच्या ताकदीचा वारसा त्यांनी चालवला. पोलीस खात्यात केलेल्या कामाबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक मिळाले, हे पदक स्वीकारण्यासाठी आमच्या सगळ्या मुसळे भावकीला सोबत घेऊन गेले होते.
पुरस्कार मिळाल्यावर मला ते म्हणाले, हा माझा एकट्याचा गौरव नाही तर आपल्या सगळ्या भावकीचा गौरव आहे. मला आज सकाळी त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर त्या वाक्याची आठवण आली आणि मी गहिवरून गेलो. अण्णा कायम माझी वाट बघत. माझा त्यांना खूप अभिमान होता. अण्णा म्हणजे आमच्या भावकीचा घराचा आधारवड.
लोकांच्यासाठी त्यांनी खूप केले. त्यांनी असंख्य मुलांना पोलीस भरती केले. एवढी कुटुंब त्यांनी प्रवाहात आणली. अण्णांना विस्मरणाचा त्रास सुरु झालेला. अण्णांनी तीन पिढ्या पहिल्या. अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी केल्या. कायम रुबाबात राहिले. स्वतः जे काम केले ते लिहून काढले, पुस्तकरूपाने जगासमोर आणले. आता आण्णा नाहीत. ते होते याचा आधार होता, आता आमच्या परिवाराचा आधार गेला.











