कोल्हापूर : महान्यूज लाईव्ह
मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टंट आरोपी चेतन पाटील व पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दोघेही फरार होते. मात्र चेतन पाटलाला कोल्हापूर पोलिसांनी शिवाजी पेठ येथील घरातून पहाटे तीन वाजता ताब्यात घेतले आहे.
कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. चेतन पाटील ला कोल्हापुरातून ताब्यात घेतले असले तरी, त्याला आता मालवण पोलिस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली जाणार आहे. चेतन पाटील याने नौदलाला डिझाईन तयार करून दिले होते, मात्र नौदलाकडून त्याला कोणतेही वर्क ऑर्डर किंवा पत्र मिळालेले नव्हते. चेतन पाटील हा स्ट्रक्चरल कन्सल्टंट होता. पुतळ्यासाठी जे फाउंडेशन उभारले होते, त्याचे डिझाईन त्याने तयार करून दिले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे जे काम केले होते ते ठाण्यातील कंपनीने केले होते असा दावा यापूर्वीच चेतन पाटील ने केला होता. आता चेतन पाटील नंतर जयदीप आपट्याला पोलीस शोधत आहेत. मात्र जयदीप आपटे अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही.











