नगर : महान्यूज लाईव्ह
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील महिलांचा रक्षाबंधन सोहळा आयोजित करण्यात आला होता. आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे यांनी हजेरी लावली. यावेळी रोहित पवार यांच्या मातोश्री व बारामतीच्या एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदा पवार, रोहित पवार यांच्या पत्नी कुंती पवार, भगिनी सई पवार यादेखील उपस्थित होत्या.
कर्जत व जामखेड तालुक्यातील 25 हजारहून अधिक महिला या कार्यक्रमास उपस्थित होत्या. या महिलांच्या मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध युवा गायक रोहित राऊत जुई जोगळेकर यांनी गावगाड्यातील विविध गाणी सादर केली. यानंतर रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा झाला. यावेळी सौ. सुळे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, रोहित पवार माझ्या भावाचा मुलगा आहे म्हणून कौतुक करत नाही, तर रोहितने स्वतःची ओळख महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारण आणि समाजकारणात करून दाखवली आहे. तो प्रचंड कष्ट करतो. ज्या पद्धतीने त्याने पूर्ण आयुष्य कर्जत जामखेड आणि महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी घालवण्याचे ठरवले आहे, त्यानुसारच तो पूर्ण वेळ देतो. याचा आम्हाला अभिमान आहे.
परंतु रोहितकडूनही आमच्या अपेक्षा आहेत, त्याने थोडासा वेळ आमच्या नातवंडासाठी द्यावा. तो सगळे दिवस बाहेर असतो. कुठे आंदोलन झाले की, पहिला रोहित पोहोचतो. कुणी उपोषणाला बसले की, तो तिथे पोहोचतो. प्रत्येकाच्या सुखदुःखात पहिला पोचणारा कोण असेल, तर महाराष्ट्रात रोहित पवार आहे हे सांगायला मला प्रचंड आनंद होत आहे.











