विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : इंदापूर मतदारसंघावरून महायुतीत भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत रस्सीखेच होणार असल्याचं समोर आलं आहे. या मतदारसंघात विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे अजित पवारांच्या पक्षातील आहेत, त्यामुळे विद्यमान आमदार ज्या पक्षाचे त्या पक्षाला ही जागा सोडायची ठरवली तर हर्षवर्धन पाटील वेगळ्या निर्णय घेण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन पाटील अपक्ष उभे राहणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. त्यानंतर हर्षवर्धन पाटील शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली.
आज बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे पत्रकारांशी संवाद साधत असताना इंदापूरचे माजी आमदार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारीच्या चिन्हावर लढतील का.? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळें यांनी हर्षवर्धन पाटील आणि आमचे सहा दशकाचे संबंध आहेत. त्यांनी हे संस्कार जपले आहेत. शंकररावभाऊंपासून आमच्या कुटुंबाचे संबंध कायम राहिले आहेत.
ते भाजपमध्ये असले तरी देखील हे प्रेमाचे नाते ते जपतात आणि मी ही आयुष्यभर ते जपणार आहे. असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या संबंधित राजकीय प्रवासाविषयी काही वक्तव्य केले नाही. अजून महाविकास आघाडीतील जागा वाटप व्हायचे आहे. त्यामुळे इंदापूरची जागा नेमकी कोणाकडे जाणार हे अजून नक्की नाही. येत्या पंधरा दिवसात आम्ही इंदापूरच्या जागेविषयी उमेदवारासह नाव जाहीर करू असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यामुळे आता शरद पवार गटाकडून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.











