विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
बारामती : पवार कुटुंबामध्ये राजकीय फूट पडल्यानंतर बारामतीमध्ये लोकसभा निवडणुकीत शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाली होती.त्यामधे शरद पवार गटाचा विजय झाला.त्यानंतरही पवार कुटुंबातील राजकीय वाद वाढण्याची चिन्हे आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी पुण्यामध्ये बोलत असताना अजित पवारांना जय पवार यांच्या उमेदवारीबाबत कार्यकर्ते मागणी करत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी या प्रश्नाबाबत उत्तर देत असताना ते म्हणाले शेवटी लोकशाही आहे. मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी तिथे सात-आठ वेळा निवडणुकीला उभा राहिलो आहे. जनतेचा कौल असेल त्याप्रमाणे आमच्या पक्षाचे संसदीय समिती त्याचा निर्णय घेईल. स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल.तो आम्ही मान्य करू असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
दुसरीकडे विधानसभेला शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार निवडणूक लढवणार असल्याची दाट शक्यता आहे. युगेंद्र पवार यांनी बारामती तालुक्याचा दौरा करत गाठीभेटीही घेण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे बारामती विधानसभा निवडणुकीमध्ये जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होण्याचे स्पष्ट संकेत आहेत.
अजित पवारांचे पुत्र जय पवार हे बारामतीमधून युगेंद्र पवार यांच्याविरोधात रिंगणात उतरण्याची दाट शक्यता आहे, तर अजित पवार हे रोहित पवार यांच्या विरोधात कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तिथेही विधानसभेलाही पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे.











