राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पाटस ते दौंड अष्टविनायक रस्त्यावर अलीकडे अपघातांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. पाटस हद्दीत आंबेडकर नगर परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी ग्रामस्थांनी निवेदनद्वारे केली आहे. येत्या पंधरा दिवसात गतिरोधक न बसवल्यास अष्टविनायक रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या आणि पाटस हद्दीतून गेलेला अष्टविनायक रस्त्या पाटस ते दौंड पर्यंत मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अलीकडे सातत्याने अपघातांच्या घटना वारंवार घडत आहेत. किरकोळ अपघाताच्या घटनांसह जीवघेण्या अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. या रस्त्यावर लोकवस्ती आणि शाळा आहे, या रस्त्यावर स्थानिक नागरिकांना शालेय विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांनी महिलांना जीव मुठीत घालून रस्ता ओलांडावा लागतो. तर पहाटे मॉर्निंग करणे धोकादायक झाले आहे.
या वर्षभरात मॉर्निंग वॉक करताना दोन जणांचा बळी या रस्त्याने घेतला आहे. या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने सुसाट ये-जा करीत असतात. त्यामुळे त्या रस्त्यावर अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. सध्या हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग कडून अष्टविनायक मार्ग विभागाकडे वर्ग झाला आहे. अष्टविनायक मार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे या रस्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. स्थानिक राजकीय नेतेही या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहेत.
या अपघाताच्या घटना रोखण्यासाठी आणि वाढत्या अपघातांना आळा बसवा यासाठी पाटस हद्दीत अंबिकानगर परिसरात रस्त्याच्या दोन्ही बाजूला डांबरी गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात दौंड सार्वजनिक बांधकाम विभाग, दौंड तहसीलदार त्यांना निवेदन दिले असून येत्या १५ दिवसांच्या आत याठिकाणी डांबरी गतीरोधक न झाल्यास रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे.











