सुरेश मिसाळ : महान्यूज लाईव्ह
इंदापूर : अनेक गुन्ह्यामध्ये वॉन्टेड असणाऱ्या तसेच एक वर्षापासून इंदापूर पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी एका ठिकाणी येणार असल्याची खबर मिळताच इंदापूर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सापळा लावला, नजरेच्या टप्प्यात येताच पोलिसांनी त्याला पकडून जेरबंद केले.
सागर उर्फ चिकास नवनाथ देवकर (रा. सरडेवाडी, ता. इंदापूर जि. पुणे) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदर आरोपीवर इंदापूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा आरोपी चिकास देवकर हा दि. 29 जुलै रोजी रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास काटी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत येणार असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली.
लगेच पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी गुन्हे शोध पथकास मार्गदर्शक सूचना दिल्या. सदर सूचनेप्रमाणे गुन्हे शोध पथकाने काटी गावामध्ये सापळा रचून सदर आरोपीस पकडून ताब्यात घेतले.
ही कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभागाचे विभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, इंदापूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक पुंडलिक गावडे, सहाय्यक फौजदार प्रकाश माने, गणेश डेरे, विशाल चौधर यांनी पार पाडली.











