बारामती : महान्यूज लाईव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाच्या वतीने बारामतीत आज जनसन्मान मेळावा होणार आहे. त्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी बारामतीत पोचले. दरम्यान यावेळी अजितदादांनी सांगितले की, पंतप्रधान मोदींनी काल तीस हजार कोटींच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांची भूमीपूजने व उद्घाटन केली.
दरम्यान महाराष्ट्रात लागू केलेल्या लाडकी बहीण माझी या योजनेची व आयटीआयच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन दहा हजार रुपयांपर्यंत करण्याचे आणि मुलींचे शिक्षण मोफत करण्याचा जो निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला, त्या संदर्भातील चर्चा संपूर्ण देशभरात असल्याचे मोदींनी सांगितले.
अजित पवार यांनी सांगितले की पंतप्रधान मोदींनी आमच्याकडून या योजनांची माहिती घेतली व या योजनेचे कौतुक देखील केले. राज्यभरातील तमाम अडीच लाखांच्या खालील वार्षिक उत्पन्न असलेल्या सर्व महिला, शालेय विद्यार्थिनी व युवा वर्गाला प्रचंड दिलासा देणारा हा निर्णय असल्याचे आम्ही त्यांना सांगितले आणि मोदींनी देखील त्याचे कौतुक केल्याचे अजित पवारांनी सांगितले.











