पंढरपूरकडे निघालेल्या वारकऱ्यांच्या बसला मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ट्रॅक्टर समोर आल्याने बस ट्रॅक्टरला धडकली आणि तब्बल 35 ते 40 फूट खड्ड्यात बस पडली. या अपघातात पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. आठ जण गंभीर जखमी झाले, तर 30 जण या घटनेत जखमी झाले आहेत. या बसमध्ये 54 वारकरी प्रवास करत होते.
ही बस डोंबिवली वरून पंढरपूरला निघाली होती डोंबिवलीतील केळझर गावातून वारकरी रात्रीच्या वेळी निघाले. पहाटे एकच्या दरम्यान या बसला अपघात झाला. ही बस रस्त्याने जात असताना अचानक समोरून ट्रॅक्टर आल्याने या ट्रॅक्टरला ही बस समोरून धडकली.
यानंतर बस शेजारच्या 35 ते 40 फूट खोल खड्ड्यात पडल्याने पाच वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला, मात्र गंभीर वारकऱ्यांची संख्या जास्त असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान या घटनेनंतर जखमी रुग्णांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, किरकोळ जखमी असलेल्या काही जखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर मुंबई ते लोणावळा या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती.











