इंदापूर : महान्यूज लाईव्ह
रविवारी सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांच्या घरात धामधूम होती.. रविवारी नातेवाईक, हितचिंतकांच्या गराड्यात त्यांचा दिवस गेला.. मुलाचा लग्न सोहळा अत्यंत दिमाखदार पार पडल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते, मात्र नियतीला ते पहावले नाही.
इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील हनुमंत आत्माराम काजळे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. रविवारीच त्यांच्या मुलाचा विवाह पार पडला होता. सोमवारी नवीन कार आणण्याचे नियोजन सुरू असताना अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला.
इंदापूर तालुक्यातील निरगुडे येथील रहिवासी असलेले हनुमंत आत्माराम काजळे हे सध्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दौंड तालुक्यातील राजेगाव शाखेत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते गेल्या दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त झाले होते, परंतु त्यांच्या कामाचा अहवाल पाहून जिल्हा बँकेने त्यांना दोन वर्षाची मुदतवाढ दिली होती.
पुणे जिल्ह्यात भोर, दौंड, बारामती, इंदापूर या तालुक्यातील अनेक शाखेत त्यांनी सेवा बजावली. सहकाऱ्यांशी आपुलकीने वागणाऱ्या या अधिकाऱ्याच्या निधनाने जिल्हा बँकेतील सहकारी देखील हळहळले.











