ज्ञानेश्वर रायते, बारामती
पूजा खेडकर या परिविक्षाधीन आयएएस अधिकाऱ्यामुळे आता युपीएससी देखील अडचणीत आली आहे. वडीलांची ४० कोटींची संपत्ती व स्वतःचे ४२ लाखांचे वार्षिक उत्पन्न असलेल्या पूजा खेडकरला ८ लाख रुपये वार्षिक उत्पन्नाचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र कसे मिळाले? त्यामुळे हेही प्रमाणपत्र देणारे कार्यालय अडचणीत सापडणार आहे, तिने दृष्टीदोष व मेंटली इलनेसचे प्रमाणपत्र सादर केले, ते देणारेही अडचणीत सापडतील.. अन कॅट व युपीएससीने तिच्या विरोधात निकाल देऊनही ती आयएएस झाली, ते ज्यांच्या मेहरबानीवरून.. तेही अडचणीत येतील.. अर्थात याची सर्वंकष चौकशी झाली तरच..!
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील निवृत्त आयुक्त दिलीप खेडकर यांची पूजा ही मुलगी. एकेकाळच्या आयएएस अधिकारी गजानन बुधवंत यांची नात.. सध्या ४० कोटींचे उत्पन्न असलेल्या वडीलांची मुलगी असलेल्या पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात परिविक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांनी रुबाब गाजवायला सुरवात केली आणि आता बरीच भांडी एकमेकांशी धडकू लागली आहेत.
अर्थात पूजा खेडकर या शांतपणे आपल्या कामाला लागल्या असत्या, तर कदाचित या साऱ्या भानगडींकडे कोणाचेच लक्ष गेले नसते, मात्र आता थेट यूपीएससी देखील संशयाच्या भोवऱ्यात एका पूजामुळे सापडले आहे. प्रचंड मेहनत घेऊन रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या पोरांना नीट ने यंदा नीट कात्रजचा घाट दाखवल्यानंतर आता असाच रात्रंदिवस मेहनतीने अभ्यास करणाऱ्यांनाही युपीएससीने चक्रावून टाकले आहे. थोडक्यात आयएएस अधिकाऱ्यांची पोरं अचानकच आयएएस किंवा आयएफएस कशी होतात याचे कोडे आता बऱ्याच जणांना सुटले असेल.
पूजा खेडकर यांची वाशिमला बदली झाली आहे, मात्र पूजा खेडकर यांच्या खोडकरपणामुळे अनेक खाती आता कायमची कामाला लागतील किमान पक्षी तिथे काय धंदा सुरू आहे याचा ताळेबंद उघड होईल. सन २०१९ मध्ये पूजा खेडकर यांनी यूपीएसससीची परीक्षा दिली होती. मात्र तिथे काहीच डाळ शिजली नाही, मग त्यांनी ओबीसीचा कुकर शिजवला. सन २०२२ मध्ये फिजीकली डिसेबल अर्थात यामध्ये दृष्टीदोष व मेंटल इलनेसची प्रमाणपत्रे त्यांनी सादर करीत तिथून परिक्षा दिली. त्यांचा ८२१ वा रॅंक आला.
अर्थात त्यांनी ज्या प्रवर्गातून परीक्षा दिली, त्या ओबीसी प्रवर्गातील शेवटचा उत्तीर्ण उमेदवार हा ४३४ रॅंकचा आहे, मग तब्बल दुपटीने पाठीमागे असलेल्या पूजा खेडकर यांचा क्रमांक कसा लागला? बरं.. आणखी एक गोष्ट म्हणजे जरी त्या उत्तीर्ण झाल्या, तरी आयएएसची रॅंक संपल्यानंतर आयआरएस, आयएफएस अशा पदांचा भरणा असतो. मग पूजा खेडकर यांना आयएएसच दर्जा कसा मिळाला? असा सवाल आता जोर धरू लागला आहे.
गंमत अशी आहे की, अती केले माती होते, असे म्हणतात. आता युपीएससीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यामुळे पूजा खेडकर सारखे किती उमेदवार असे मागच्या दाराने आयएएस होतात यावरच आता सखोल संशोधनाची गरज आहे. ओबीसी प्रवर्गातून आरक्षित जागेवरून परीक्षा द्यायचे ठरवले, तरी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी वार्षिक ८ लाखांची उत्पन्न मर्यादा असलेले प्रमाणपत्र द्यावे लागते, मग जिथे वडीलांचे उत्पन्न ४० कोटी आहे आणि स्वतःला त्यातून ४२ लाख रुपये वर्षाला मिळतात, तिथे ८ लाखांचे वार्षिक उत्पन्नाचे प्रमाणपत्र कोणी दिले? हाही प्रश्न आता जोर धरू लागला आहे.
जर ऑडीसारखी आलिशान गाडी भन्नाटपणे चालवता येते, तर दृष्टीदोषाचे प्रमाणपत्र कोणी दिले? हे प्रमाणपत्र पडताळणीसाठी यूपीएससी व कॅटने जेव्हा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावले, तेव्हा वेळोवेळी कधी कोरोनाचे तर कधी आजारपणाचे कारण सांगून ही वैद्यकीय चाचणी का टाळली गेली? तब्बल ६ वेळा एक आयएएस अधिकारी शासनाच्याच सूचना डावलतो, तेव्हाही ही गोष्ट गांभिर्याने का लक्षात आली नाही? या अनेक प्रश्नांना उत्तर एकच.. युपीएससी गंडली आहे किंवा पोखरली गेली आहे..!
पूजा खेडकरची वाशिमला बदली करून चालणार नाही.. ज्या देशात रक्ताचे पाणी करून रात्रंदिवस मेहनत घेऊन गरीबांची पोरं अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगत अभ्यास करतात. त्यांच्या या अभ्यासासाठी रक्ताचे पाणी करून मध्यमवर्गीय व कनिष्टवर्गीय आईबाप घासातला घास बाजूला काढून त्यांच्या शिक्षणाचे पैसे भरतात, त्या साऱ्यांच्या मेहनतीला चुना लावणारे कर्दनकाळ शोधलेच गेले पाहिजेत.
जोपर्यंत या प्रश्नाच्या मुळाशी कोण जात नाही, तोपर्यंत असे झारीतले शुक्राचार्य सापडणार नाहीत, मुळात कदाचित खूप मोठी साखळी असेल.. मागच्या दाराने आयएएस घडविण्याची. ती उघड होऊ नये यासाठी खूप प्रयत्न होतील, मात्र ती उघड होऊ नये यासाछी मोठा खटाटोप होऊ शकतो. ती उघड करण्यासाठीचा दबावगट मोठा झाला पाहिजे.. बरे झाले, पूजा खेडकरांनी रुबाब केला नसता, तर अनेक गोष्टी समोर आल्या नसत्या.. जय लोकशाही..!











