काका यादव : भवानीनगर
इंदापूर तालुक्यातील जाचकवस्ती गावात आज पहाटे दीड ते दोन च्या सुमारास चोरट्यांनी धुमाकूळ घातला. तीन घरे फोडून चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक घर चोरट्यांना फोडता आले नाही. मात्र दोन ठिकाणी चोरट्यांनी चोरी केली.
पहाटे दीड ते दोनच्या दरम्यान चोरट्यांची टोळी अगोदर जाचक वस्ती येथील ग्रामपंचायत पाठीमागील ननवरे वस्ती येथे शिरले, मात्र तिथे जागे झालेल्या लोकांनी त्यांचा पाठलाग केला आणि चोरटे पळून गेले. त्यानंतर चोरट्यांनी जाचक वस्तीवर आपला मोर्चा वळवला.
तेथे प्रतापसिंह जाचक यांच्या बंगल्याला लावलेला सुरक्षा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, मात्र तो दरवाजा तुटत नसल्याचे पाहून त्यांनी काही अंतरावरील लालासाहेब तांबे यांच्या घरी चोरी करण्यासाठी मोर्चा वळवला. तांबे कुटुंब बाहेरगावी असते, त्या ठिकाणी त्यांनी दरवाजे तोडून आत मध्ये प्रवेश केला. येथील सीसीटीव्ही च्या डीव्हीआर च्या केबल देखील त्यांनी तोडून टाकल्या.
तिथे जी चोरी झाली, ती अद्याप तपशीलासह बाहेर आलेली नाही, परंतु त्यानंतर चोरट्यांनी शेजारच्याच पार्लेकर वस्तीवर जाऊन सुखदेव पार्लेकर यांच्याही घरी चोरी केली. या ठिकाणी दरवाजा तोडून तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. दरम्यान या साऱ्या प्रकारात चोरट्यांनी नियोजनबद्ध रीतीने सूर्य करण्याचा प्रयत्न केला वस्तीवरील कुत्र्यांना गुंगीचे औषध खायला घातल्याने कुत्री देखील गुंगीत होती असे येथील नागरिक सांगत आहेत.
दरम्यान वालचंदनगर पोलिसांना याची आज सकाळी माहिती दिल्यानंतर भवानीनगर व वालचंदनगरचे पोलीस पथक या ठिकाणी आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे हेही या ठिकाणी पोचले असून घटनास्थळाची पाहणी त्यांनी केली.











