राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
शनिवारी ( दि. २९) वेळ रात्री अकराची.. शिक्रापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस हवालदार बाळासाहेब तळोले हे रात्रीची गस्त घालण्यासाठी निघाले. गस्त घालत असताना हॉटेल साईसागर, मलठण फाटा येथे गर्दी दिसल्याने त्यांनी गाडी थांबवली. एका ट्रॅव्हल्स बसमध्ये अस्मिता (रा.शेगाव, जिल्हा बुलढाणा ) ही नऊ महिन्यांची गर्भवती महिला ट्रॅव्हल्स मध्ये प्रवास करत असताना तिच्या पोटात दुखायला लागले..
अस्मिता हिच्या सोबत तिची सासू आई आणि लहान मुलगी अशा चौघी होत्या. अस्मिताची डिलिव्हरी तारीख 17 जुलै होती त्यामुळे सर्व पुण्यावरून गावी निघाले होते. या खाजगी बसमध्ये जवळपास 40- 50 इतर प्रवासीही होते, मात्र अस्मिता च्या वेदना असह्य होत असताना, समोर दिसत असतानाही या बसमधील कोणीही कसल्याही प्रकारची मदत करण्याची उत्सुकता दाखवली नाही.
दरम्यान ही परिस्थिती लक्षात घेता सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे, पोलीस हवालदार तळोले यांनी ॲम्बुलन्स वाल्यांना फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला, आसपासच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी फोन करून मदतीसाठी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र फोन ही लागला नाही. अस्मितेच्या वेदना पाहून क्षणात काय होईल हे ही सांगता येत नव्हते, काय करावं काय नाय हा तेच वाबळे यांच्या समोर होता.
मात्र वाबळे यांनी अस्मितेच्या सासुची परवानगी घेतली आणि अस्मिताला ट्रॅव्हल्स बस मधून उतरवून हॉटेलच्या समोर जमिनीवर बसवले. तिथे तिच्या आईची आणि सासूची धावपळ चालू होती, पोलीस हवालदार बाळासाहेब तळोले यांनी बरीच फोनाफोनी करुन अँब्युलन्स ला संपर्क केला, पण अस्मिताच्या वेदना वाढल्या अन् त्याचवेळी तिच्या सासूने वाबळे यांना सांगितले की, साहेब..बाळाने जन्म घ्यायला सुरुवात झाली आहे.
आता मात्र वाबळे हे पुर्ण पणे गडबडले,पण त्यातून ही स्वतः लाच धीर देत अस्मिता व तिच्या सासूची परवानगी घेऊन तिला दोन पायावर खाली बसवले व तिचे खांदे दाबून जोर लावायला लावला आणि चमत्कार झाल्यासारखे कसल्याही वैद्यकीय मदतीशिवाय, कोणाच्या मदतची वाट न पहाता अस्मिता ने रस्त्याच्या बाजूला एका उघड्या पटांगणात रविवारी (३० ) १२.४० वाजण्याच्या आसपास एका सुंदर अशा बाळाला जन्म दिला. सह
ायक पोलिस निरीक्षक केशव वाबळे आणि पोलीस हवालदार बाळासाहेब तळोले यांनी सुटकेचा निःश्वास टाकला. अस्मिता चा इच्छाशक्ती आणि परमेश्वराच्या कृपेने अस्मिता आणि बाळ सुखरूप झाले. पण डिलीव्हरी झाली खरी, आता प्रश्न होता, नाळेचे काय करायचे? कारण डिलिव्हरी झाल्यावर अस्मिता चा खूप रक्तस्त्राव चालू होता. दोन कपडे पूर्ण रक्ताने माखले होते, पण आता अस्मिता आणि बाळ स्टेबल झाले होते . त्यामुळे चिंता कमी झाली होती.
तेवढ्यात ॲम्बुलन्स आल्याने नाळेसह अस्मिता व बाळाला उचलून ॲम्बुलन्स मध्ये ठेवले. आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविले. अस्मिता, तिची आई आणि सासू सहाय्यक पोलीस निरीक्षक वाबळे यांना हात जोडून तुम्ही माय- बापा सारखे धावून आला असे म्हणत आभार मानले. थोड्यावेळापूर्वी डोळ्यात वेदना असणाऱ्या अस्मिताच्या चेहऱ्यावर बाळाला जन्म दिल्याने हसू आले होते.
आजी आणि आईच्या चेहऱ्यावरचा आनंद लाखमोलाचा होता. बाळाच्या बापाला फोनवरून ही सुखद बातमी कळवली. पोलीस अधिकारी म्हणून ड्युटी करत असताना अनेक अनेक चांगले वाईट प्रसंग आले , पोलिसांना दैनंदिन कामकाज करताना अनेक वेळ प्रसंगी कठोर भूमिका ही घ्यावी लागतात पण आज चक्क डॉक्टरांचे काम करावे लागेल आणि तेही सक्सेसफुल झाले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे यांनी सांगितले की, मला दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळी ड्युटी मुळे जाता आले नव्हते आणि या वेदना , त्रास फक्त बायकोच्या तोंडून ऐकल्या होत्या, पण आज प्रत्यक्ष पाहिल्यावर एका स्त्रीला मुलाला जन्म देताना काय त्रास होतो याची प्रचिती अनुभवली. दोन तासात एकापाठोपाठ दोन चमत्कार घडले. शनिवारी रात्री 11:00 वाजता भारताने t20 वर्ल्ड कप फायनल ची मॅच भारतीय क्रिकेट संघाने जिंकली, आणि लगेचच दुसरा दिवस चालू झाल्यावर दिनांक रविवारी (दि.३०) १२.४० वाजता रस्त्याच्या कडेला उघड्यावर कोणत्याही सोयी सुविधा उपलब्ध नसताना एका सुंदर बाळाचा दिमाखात जन्म झाला.











