बारामती : महान्यूज लाईव्ह
राज्यातील सरकारची धोरण व्यवस्थित नसल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत चालल्यात आहेत. परंतु कर्जे देखील वाढत चालली आहेत, अशा परिस्थितीत राज्यातील दुष्काळ, अवकाळी पाऊस, पाऊस, खते, बी बियाण्यांचे वाढलेले दर, बाजारातील शेतमालाचे ढासळलेले दर यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे वयाची 35 ओलांडून देखील शेतकऱ्याची मुले अविवाहित आहेत.
त्यांच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनला आहे. केवळ शेतीशी निगडित असल्यामुळेच आर्थिक परिस्थिती बिकट झाले असून या मुलांची लग्न होत नाहीत. त्यांचा प्रश्न राज्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उचलून धरला असून आता अशा शेतकऱ्यांच्या मुलांना सामाजिक बांधिलकी म्हणून पाच लाख रुपये स्त्रीधनापोटी म्हणून द्यावेत, तसेच जिल्हा उद्योग केंद्रमार्फत नवविवाहित जोडप्यांना 25 लाख रुपयांचे प्राधान्याने कर्जवाटप करावे असा ठराव स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली. राजू शेट्टी हे वेगवेगळ्या विषयावर येत्या काळात आंदोलन करणार आहेत. त्यातील एक विषय शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नाचा देखील असणार आहे. केवळ शेतीत काम करतात म्हणून शेतकरी नवरा नको अशी भूमिका सध्या सार्वत्रिक दिसू लागली आहे. त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या मुलांच्या लग्नामध्ये होऊ लागला आहे. शेतकऱ्यांच्या मुलाची लग्न जमत नाहीत याची वस्तूस्थिती आहे.
बारामतीत दोन दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये 14 ठराव करण्यात आले. यामध्ये काही सामाजिक ठराव देखील करण्यात आले त्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलाच्या लग्नाचा विषय घेण्यात आला होता.











