राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह
दौंड : पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजपूर जवळ पंढरपूरकडून मुंबईकडे भरधाव वेगाने जाणारी एसटी बस झाडाला जाऊन आदळल्याने भीषण अपघात घडला. या अपघातात 25 ते 30 च्यावर प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
राज्य परिवहन विभागाची पंढरपूर डेपोची एसटी बस ही पंढरपूर कडून पुणे दिशेला जात असताना रविवारी( दि २३) दुपारी एक वाजण्याच्या आसपास ही दुर्घटना घडली. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजपुर जवळ आल्यावर ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला.
मात्र या अपघातात जिवीतहानी सारखी मोठी दुर्घटना टळली असून, बसमध्ये प्रवासी थोडक्यात बचावले आहेत. मात्र या अपघातात बसमधील 25 ते 30 प्रवासी जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. अपघाताची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे महामार्गावर काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. या अपघातात बसची पुढील बाजूस तोडफोड झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.











