पुणे : महान्यूज लाईव्ह
काल पुणे शहरातील पुलगेटच्या परिसरात पीएमपीएमएलच्या बसने दिलेल्या धडकेत 21 वर्षाच्या यश कसबेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र त्याहीपेक्षा त्याचा मृत्यू पुण्याच्या प्रशासनाला एक संदेश देऊन गेला. माझ्या बाबतीत असं घडलं इतरांच्या बाबतीत नको! तब्बल अर्धा तास यश कसबेकर हा या बसच्या चाकाखाली होता. त्याच्या पोटावर बसचे चाक होते. अक्षरशः तडफडून त्याचा मृत्यू झाला.
पीएमपीएमएल विभागाची वातानुकूलित इलेक्ट्रिक (क्रमांक एम एच बारा टीव्ही 38 14) बसच्या चालकाने अत्यंत निष्काळजीपणाने व वेगात गाडी चालवली. हडपसरला निघालेल्या या बसने केवळ दहा मीटर अंतरावर यू टर्न घेतला. त्यामुळे हा भीषण अपघात झाला. त्यामुळे लष्कर भागातील नागरिक या अपघाताला या बसच्या चालकालाच दोष देत आहेत दरम्यान या बसचालकासह स्टेशन मास्तर आणि कर्मचाऱ्यांवर ही गुहा दाखल करावा अशी मागणी लष्कर विभागातील नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे रात्रीच्या साडेनऊ वाजता हा अपघात झाला, तेव्हा अपघात झाला आहे हे माहीत असताना देखील बस चालकाने बस मागे घेतली नाही. अर्ध्या तासापेक्षा अधिक काळ या गाडीचे चाक यश कसबेकर याच्या पोटावरच होते. पोलिसांनी घटनास्थळी पोचून तातडीने सोपस्कार केले, पण जर या ठिकाणी वेळीच बस बाजूला केली असती, तर यश कसबेकर याचा जीव वाचला असता अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.











