विक्रम वरे : महान्यूज लाईव्ह
माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना व स्वाभिमानी पक्ष हे येत्या एक जुलैपासून वसंतराव नाईक कर्जमुक्ती योजना लागू करावी यासाठी राज्यात संपूर्ण कर्जमाफी व विज बिल माफीसाठी आंदोलन करणार आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राज्य कार्यकारिणीची दोन दिवसीय बैठक बारामतीत नुकतीच पार पडली या बैठकीतील ठरावा संदर्भात आज माजी खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. संघटनेने एकूण 14 ठराव केले असून यामध्ये संपूर्ण कर्जमाफी, वीजबिल माफीचा विषय आहे. त्याचबरोबर दुधाला प्रतिधर सात रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची देखील मागणी एका ठरावात करण्यात आली आहे.
या संदर्भात राजू शेट्टी म्हणाले, सरकारच्या धोरणामुळेच शेतकऱ्यांची कर्ज वाढत चाललेली आहेत व शेतकऱ्यांची कर्ज फिटत नाहीत, आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे, ते सरकारच्या धोरणामुळे झाले आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा संपूर्ण कर्जमाफीची हाक द्यावेई लागणार आहे. येत्या एक जुलैपासून आम्ही वसंतराव नाईक कर्जमुक्ती योजना या नावाखाली राज्यभर आंदोलन करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहोत व सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडणार आहोत.











