सासवड : महान्यूज लाईव्ह
माजी मंत्री व पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे हे त्यांच्या बेधडक वक्तव्याबद्दल प्रसिद्ध आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देखील त्यांनी अनेक वक्तव्य केली, ज्याच्यातून संपूर्ण राज्यभर राजकीय गदारोळ निर्माण झाला. ओठात आणि पोटात वेगळे काहीही नसणारा नेता म्हणून विजय शिवतारे प्रसिद्ध आहेत. आता विजय शिवतारे यांनी विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात एक वक्तव्य करून पुन्हा जोरदार चर्चा घडवली आहे.
सासवड येथील आचार्य अत्रे सभागृहात विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला विजय शिवतारे यांनी हजेरी लावली. यावेळी विजय शिवतारे यांनी केलेला भाषणात त्यांची लहानपणीची आठवण सांगितली. आपण हुशार होतोच, पण बंडखोर देखील होतो आणि वांडही होतो असे सांगत हा बंडखोरपणा लहानपणापासूनच रुजल्याचे त्यांनी या भाषणातून दाखवून दिले.
विजय शिवतारे या भाषणात म्हणाले, लहानपणी मी फार वांड होतो, चौथीत असताना बिड्या प्यायचो. हे सांगितले तर कोणाला खरे वाटणार नाही, पण चौथीत असताना जनावरे वळायला जायचो. त्यावेळी आईच्या पिशवीतून पैसे चोरून बिड्या आणायचो आणि ओढायचो. बिडी ओढली की चक्कर येऊन पडायचो, असे असले तरी शाळेत माझा पहिला नंबर होता हा माझा पहिला नंबर आजही तुम्ही गेला तर त्या परिंचे मधील शाळेत माझ्या बोर्ड वरती नंबर तुम्हाला दिसेल असे सांगत त्यांनी बिडीचा विषय सोडा पण अभ्यासात आपण कधीच कमी पडलो नाही हे देखील आवर्जून सांगितले.











