बीड : महान्यूज लाईव्ह
शिवसंग्राम चे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी अखेर शासकीय नोकरीचा राजीनामा दिला असून, लोकसभा निवडणूक लढवायचीच असा निर्धार केला आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात ज्योती मेटे विरुद्ध पंकजा मुंडे असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. अर्थात ज्योती मेटे या महाविकास आघाडी कडून लढणार का? हे मात्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
ज्योती मेटे यांनी काही दिवसांपूर्वी शरद पवार यांचीही भेट घेतली आणि त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. शिवसंग्राम हा महायुतीचा घटक पक्ष असल्याचा निर्वाळा त्यांनी त्यावेळी दिला होता. त्यामुळे ज्योती मेटे या नेमक्या कोणाच्या उमेदवार म्हणून उभे राहणार हा देखील प्रश्नच आहे.
धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय बजरंग सोनवणे यांनी महाविकास आघाडीत प्रवेश केल्यानंतर त्यांना बीडची उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यात मध्येच ज्योती मेटे यांच्या भूमिकेचा प्रस्ताव पुढे आला आणि ज्योती मेटे या निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली, मात्र ज्योती मेटे या नेमक्या कोणाकडून निवडणूक लढवणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मात्र जर ज्योती मेटे व पंकजा मुंडे यांच्यात लढत झाली, तर मराठा विरुद्ध ओबीसी असे स्वरूप बीड मतदार संघाला येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात जर बजरंग सोनवणे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील, तर या ठिकाणी तिरंगी लढत होऊन पंकजा मुंडे यांना फायदा होऊ शकतो.











