बारामती : महान्यूज लाईव्ह
सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सख्खे बंधू श्रीनिवास पवार व शर्मिला पवार यांनी काटेवाडीत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या अनौपचारिक संवादादरम्यान श्रीनिवास पवारांनी केलेले भावुक भाषण राज्यभर चर्चेत आले आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत असून, या भाषणामध्ये श्रीनिवास पवारांनी अजित पवारांना चांगलेच सुनावले आहे.
या भाषणात सुरुवातीलाच श्रीनिवास पवारांनी मी काटेवाडीत आणि दादांचे विरोधात कसा? असं तुम्हाला वाटलं असेल अशी भाषणाची सुरुवात केली आणि ते म्हणाले, चांगल्या वाईट सगळ्या निर्णयात मी दादाला साथ दिली. मी सांगितलं होतं दादाला की, आमदारकी आपल्याकडे आहे, तर खासदारकी साहेबांकडे राहू देत. तो सांगेल तसं मी ऐकत राहिलो. कधीही विचारलं नाही की, हा निर्णय चुकीचा की बरोबर? खरे तर साहेबांचे खूप मोठे उपकार आमच्या कुटुंबावर आहेत. मी हे दादांनाही सांगितले होते. साहेबांचं वय 83 झाले असल्यामुळे त्यांना सोडणं हे मला पटलेलं नाही.
माझे काही मित्र पण म्हणाले, इथून पुढची वर्ष दादांची आहेत. साहेबांची नाहीत. तो विचारच मला अतिशय वेदनादायी वाटला. आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही. का? तर पुढील दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे, त्याच्यासारखा नालायक माणूस नाही असे माझे म्हणणे आहे. आपले वडील शेतात काम करतात. आपण बांधावरून चक्कर मारतो, याचा अर्थ असा नाही की त्यांनी सगळे आपल्याला दिलेले आहे. जमीन आपल्या नावावर केली, म्हणून काही त्या बापाला घराबाहेर काढायचे नसते.
ज्यांना कोणाला पदे मिळाली ती सगळी साहेबांमुळे मिळाली आहेत, अगदी पहिल्या दिवसापासून ते आत्तापर्यंत आणि त्याच साहेबांना आता आपण घरी बसा, असे म्हणणे हे माझ्या मनाला पटले नाही. मी थोडा वेगळा माणूस आहे. मी राजकारणी नाही. जे मला पटत नाही, ते मी करत नाही. माझ्या शाळेतले मित्रही मला न सांगता गेले. काही हरकत नाही. आपण औषध सुद्धा विकत असताना त्यामध्ये एक्सपायरी डेट पाहतो. त्याप्रमाणे काही नात्यांची पण एक्सपायरी डेट असते ती एक्सपायरी डेट झाली, असं समजायचं आणि पुढे चालायचं. वाईट वाटून घ्यायचं नाही.
मला दबून जगायचं नाही. माझेही साठ वर्षे वय चालू आहे. मला स्वाभिमानाने जगायचे आहे. प्रत्येकाने हे लक्षात ठेवले पाहिजे. आपल्याकडे पूर्वी असे म्हणायचे मरावे परी किर्ती रूपे उरावे पण मला ती म्हण अजिबात पटत नाही, एकदा आपले डोळे मिटले की, आपण पुन्हा कधी येणार आहे का? इकडे त्या कीर्तीला काय चाटायचे आहे का?
केवळ कुणीतरी लाभार्थी आहे, म्हणून त्याच्या मागे जायचे मला वाटत नाही. त्यांना झोप आता येत असेल प्रत्येकाला आपले विचार असतात. साहेबांच्या बद्दल तेच म्हणेन की, साहेबांनी काय केले? याच्यासारखा आश्चर्यकारक प्रश्न नाही. साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25 वर्षे मंत्री केले. तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले? असं म्हणणे म्हणजे आश्चर्यच. असे काका मला मिळाले असते, तर मी सुद्धा खुश झालो असतो. असा त्रास देणारी व्यक्ती कोणाला नको आहे?
एवढी वर्ष तुम्हाला समजले नाही का? ही सगळी बीजेपी ची चाल आहे. ही आरएसएसची केव्हापासूनची चाल आहे. त्यांना पवार व शरद पवार हे नाव संपवायचे होते. त्यांनी खूप प्रयत्न केला आणि तुम्ही जे काही इतिहास वाचत असाल, ते जर पाहिले तर इतिहासातही हे झाले आहे. घर एकत्र असेल, तर संपत नाही. मात्र कुठेही पहा अगदी राजे रजवाडेपासून आतापर्यंत पहा. घरातली व्यक्ती जर बाहेर निघाली, तर ते घर संपते. घरातलाच माणूस घरच्यांना घाबरत नाही. नाहीतर गावात भीती असते.











