शिरूर : महान्यूज लाईव्ह
शिरूर तालुक्यात अरणगाव मध्ये चोरट्यांनी घरफोडी करत वृद्धांना केलेल्या मारहाणीत एका वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला आहे. फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ७० वर्ष) असे मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचे नाव आहे, तर आनंदा ठोंबरे हे जखमी झाले आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरणगाव येथील ठोंबरे वस्तीवर आनंदा ठोंबरे व फुलाबाई ठोंबरे हे वृध्द दांपत्य घरी झोपले होते. पहाटे अचानक घरात चोरट्यांनी प्रवेश करत ठोंबरे दांपत्याला मारहाण करत रोख रक्कम व दागिने चोरण्याचा प्रयत्न केला.
या वेळी जागे झालेल्या फुलाबाई व आनंद ठोंबरे यांना चोरट्यांनी बेदम मारहाण केली. या झालेल्या मारहाणीत फुलाबाई व आनंदा यांना जबर मारहाण झाल्याने, त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्यानंतर शेजारचे जागे झाले व चोरट्यांनी पोबारा केला. दरम्यान दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरु असताना फुलाबाई ठोंबरे यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपीच्या शोधार्थ विविध तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. यापूर्वीही शिरूर तालुक्यात न्हावरे, संविदणे येथे ही वृध्द दांपत्याला मारहाण करत चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठ्या कसोशीने तपास करत आरोपी अटक केले होते. आता या प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. शिरूर तालुक्यात चोरीचे प्रकार वाढले असून पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.











